मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका, उद्यापासून मोजावे लागणार पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:31 AM2022-05-31T10:31:17+5:302022-05-31T10:35:52+5:30
राजकीय पक्षांच्या विरोधानंतरही टोलवसुली होणार, तयारी झाली पूर्ण. पाहा किती मोजावे लागतील पैसे
सिंधुदुर्ग : मुंबईगोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Mumbai Goa Highway Toll) ओसरगाव टोलनाका (Osargaon Toll) अखेर उद्यापासून (१ जून) पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरुन प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या टोलनाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरु करु नका, असं अनेकांनी म्हटलं होतं. टोल सुरु केला, तर आंदोलन करु असा इशाराही देण्यात आला होता. परंतु उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाका सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सगळी तयारीदेखील पूर्ण झाली आहे. या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय. ओसरगावसोबत राजापूर-हातीवले (Rajapur Toll) मधील टोलही उद्यापासून सुरु होणार आहे.
चौपदरीकरणामुळे वेगवान प्रवास
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झालं असून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओसरगाव हा टोल कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं. तूर्तास टोल सुरु करु नये यावरुन राजकारणंही तापलेलं. दरम्यान, उद्यापासून ओसरगावचा टोलनाका सुरु करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. हा टोलनाका सुरु होत असल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
का आहे नाराजी?
टोल सुरु केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना भुर्दंड बसेल, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान. टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे.
बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.
थोडक्यात पण महत्त्वाचं
- टोलपासून २० किमीच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक पास
- ३१५ रुपयांत महिनाभर आसपासच्या वाहनांचा प्रवास करता येणार आहे.
- बाईकला आणि रिक्षाला टोलमधून सूट
- मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना टोलवसुलीतून दिलासा मिळाला आहे.
- मुंबई-गोवा महामार्गानं प्रवास करणाऱ्यांना टोलवसुलीचा फटका बसणार आहे.
- गोव्याहून सिंधुदुर्गात नियमित ये-जा करणाऱ्यांना टोलवसुलीमुळे पैसे मोजावे लागणार आहे.
असा असेल टोलचा दर
- जीप, व्हॅन, कार – सिंगल जर्नी ९० रुपये
- रिर्टन जर्नी टोल घेतल्यास १३५ रुपये दर
- हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी १३५ रुपये
- रिटर्न जर्नीसाठी २२० रुपये
- ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल) – ३०५ रुपये
- रिटर्न जर्नीसाठी ४६० रुपये
- ट्रक आणि बस (ट्रिपल अँक्सल) – ३३५ रुपये
- रिटर्न जर्नीसाठी – ५०० रुपये
- MH ०७ पासिंग वाहनांसाठी ४५ रुपये टोल
- MH ०७ पासिंग मिनीबससाठी ७५ रुपये
- MH ०७ पासिंग ट्रक-बससाठी ११५ रुपये