पाटीलने सांगितले वस्तू ताब्यात घ्या, अन् खंडागळे अडकला; सावंतवाडी पोलीस लाचप्रकरणी धक्कादायक खुलासे बाहेर
By अनंत खं.जाधव | Published: October 14, 2023 05:49 PM2023-10-14T17:49:18+5:302023-10-14T17:49:59+5:30
घटनेच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हा मंत्री दीपक केसरकर यांच्या सुरक्षा दौऱ्यात
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यात घडलेल्या लाच प्रकरणातील धक्कादायक खुलासे आता बाहेर येऊ लागले आहेत. घटना घडली त्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे हे पोलीस ठाण्यात होते. त्यांना पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील याने फोन करून वस्तू ताब्यात घ्या असे सांगितले. त्यामुळेच खंडागळे याने पैसे घेत ते गोणपाटात लपवून ठेवले होते. ते नंतर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.
सावंतवाडी पोलिस ठाण्यात तीन दिवसापूर्वी लाचलुचपत विभागाकडून धाड टाकून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला एक लाखाची लाच घेतना रंगेहाथ पकडले होते. मात्र ही लाच स्वीकारण्यापूर्वी या प्रकरणातील धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. तक्रारदार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांने उच्च न्यायालयात जात या प्रकरणात जामिन घेतला होता. मात्र त्यानंतर ही पोलिसांकडून ससेमिरा थांबत नव्हता.
या काळात तक्रारदार आणि पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील याच्यात सतत बैठका होत होत्या. या बैठका एका हॉटेलात होत असत या बैठकीत पाटील हा तक्रारदाराला तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला गुन्ह्यातून बाहेर काढतो असे सांगत होता. तर त्याची शेवटची बैठक बुधवारी रात्री माजगाव येथे कारमध्ये झाली होती. ही बैठक होण्यामागे तक्रारदार याला विश्वास पटावा म्हणून खुद्द पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यानेच त्याला फोन करून बोलावून घेत तपास अधिकाऱ्यांसमोर बसवले. या तिघामध्ये चर्चा झाल्यानंतर तक्रारदारास विश्वास पटला आणि त्याने आपण ठरल्याप्रमाणे पैसे आणून देतो असे सांगून तक्रारदार तेथून निघून गेला.
त्यानंतर घटनेच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हा मंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत होता. याची कल्पना तक्रारदारास नव्हती त्याने पाटील याला फोन केला आपण सांगितल्या प्रमाणे पैसे आणले आहेत असे सांगितले कोणाकडे द्याचे विचारल्यावर मी बाहेर आहे साहेबांकडे द्या असे सांगितले. पाटील याने खंडागळे याला फोन करून सांगितले. वस्तू घेऊन आला आहे ती ताब्यात घ्या त्याप्रमाणे तक्रारदार कडून खंडागळे याने पैसे ताब्यात घेतले आणि तेथेच लाचलुचपतचे काम सोपे झाले.
पैसे गोणपाटात दडवले
तक्रारदार याने एवढी मोठी रक्कम दिली ती कुठे ठेवायची म्हणत खंडागळे याने ते पैसे गोणपाटात दडवून ठेवले त्याचवेळी लाचलुचपत ने त्याच्यावर धाड टाकली बराच उशिर पैसे सापडत नव्हते म्हणून लाचलुचपत ने खंडागळे याच्या हाताला पावडर लागली का याची तपासणी केली असता पावडर लागली आहे.म्हणून आजूबाजूला तपासणी केली तेव्हा गोणपाटात पैसे सापडले.आणि सर्व गुढ उलगडले.