प्रत्येक दिवशी गस्त सुरू रहायला हवी, दीपक केसरकरांकडून मत्स्य अधिकारी फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:14 PM2019-02-21T15:14:04+5:302019-02-21T15:16:17+5:30
काही दिवसांपूर्वी निवती रॉकनजीकच्या समुद्रात स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना मलपीतील हायस्पीड नौकांनी घेरल्याची घटना घडली होती. या दहशतीच्या प्रकारानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागास विशेष गस्ती मोहिम राबविण्याचे आदेश दिले.
सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी निवती रॉकनजीकच्या समुद्रात स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना मलपीतील हायस्पीड नौकांनी घेरल्याची घटना घडली होती. या दहशतीच्या प्रकारानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागास विशेष गस्ती मोहिम राबविण्याचे आदेश दिले.
देवगड वगळता मालवणात याची कार्यवाही न झाल्याने केसरकर यांनी पोलिस, सागरी पोलिस, मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रत्येक दिवशी गस्त सुरू राहायला हवी असे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर तत्काळ समुद्रात गस्त घालण्यास संबंधित यंत्रणा रवाना झाली.
निवती रॉक येथील समुद्रात मासेमारीस गेलेल्या दांडी व सर्जेकोट येथील दोन पारंपरिक मच्छिमारांच्या होड्यांना मलपीतील हायस्पीड नौकांनी घेरल्याचा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेत तत्काळ पोलीस अधीक्षक, मत्स्य व्यवसाय आयुक्तांशी संपर्क साधत विशेष गस्ती मोहिम राबविण्याचे आदेश दिले.
त्यानुसार देवगड समुद्रात संबंधित यंत्रणेकडून गस्तीची कार्यवाही सुरू झाली. मात्र मालवणच्या समुद्रात गस्त सुरू झाली नाही. शिवजयंतीच्या निमित्ताने पालकमंत्री केसरकर हे मालवण दौºयावर आले होते. यावेळी मच्छिामार नेते बाबी जोगी यांनी त्यांचे लक्ष वेधत येथील गस्त अद्यापही सुरू झाली नसल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांची कानउघाडणी
यावर केसरकर यांनी तहसीलदार, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, पोलिस निरीक्षक, सागरी पोलिस ठाण्याचे अधिकारी यांना बोलावून घेत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रत्येक दिवशी समुद्रात गस्त घातली गेलीच पाहिजे अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पोलिस, मस्यव्यवसायचे कर्मचारी संयुक्त गस्तीसाठी समुद्रात रवाना झाले.