पवारांची ईडी चौकशी ही राजकीय हतबलता असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 04:53 PM2019-09-27T16:53:25+5:302019-09-27T16:55:01+5:30
राज्य सहकारी बँकेचे संचालक नसतानासुद्धा लोकनेते शरद पवार यांच्यावर राज्य व केंद्र सरकारने ईडीमार्फत गुन्हा दाखल करून आपली राजकीय हतबलता दाखवून दिली.
वेंगुर्ला : राज्य सहकारी बँकेचे संचालक नसतानासुद्धा लोकनेते शरद पवार यांच्यावर राज्य व केंद्र सरकारने ईडीमार्फत गुन्हा दाखल करून आपली राजकीय हतबलता दाखवून दिली.
या बदनाम करण्याच्या षड्यंत्राचा राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध करतो. तसेच महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या सुडाच्या राजकारणाचा बदला येत्या विधानसभा निवडणुकीत घेऊन युती सरकारला जागा दाखवून देईल, असे मत प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी मांडले.
सहकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे शरद पवार यांना राज्यातील जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून, पवार यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र युती शासन करीत आहे. कितीही अपप्रचार केला तरी २०१४ ची पुनरावृत्ती होणार नाही.
२०१९ चे निर्णय हे विचार करायला लावतील. पाच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यामुळे त्यांना यात्रा काढाव्या लागतात. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ३७० किंवा सर्जिकल स्ट्राईकचा आधार घ्यावा लागतो. मात्र, पुलवामा हल्ल्यात ४० निरपराध सैनिकांचा बळी गेला त्याबाबत बोलत नाहीत.
संरक्षणासारख्या गंभीर प्रश्नांवर महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागणे चुकीचे आहे. सुज्ञ जनता भाजपच्या या सुडाच्या राजकारणाचा बदला येत्या विधानसभा निवडणुकीत घेऊन युती सरकारला जागा दाखवेल, असे गावडे यांनी पत्रकात म्हटले आहे.