पावणेदोन लाखांची दारू पकडली, महामार्गावरील ओसरगाव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 PM2020-01-18T18:00:17+5:302020-01-18T18:02:11+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांव नवीन टोलनाका येथे शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत १ लाख ८0 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांव नवीन टोलनाका येथे शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत १ लाख ८0 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी तेजस दिनेश गिरी (२६ रा. माठेवाडा सावंतवाडी) व आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (२७ रा. सातार्डा, सावंतवाडी)या दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, जवान आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, जे. आर. चव्हाण, एच. आर. वस्त, आर. एस. शिंदे यांच्या टीमने कणकवली तालुक्यातील ओसरगांव येथील नवीन टोलनाका येथे सापळा रचला होता.
त्यानुसार शुक्रवार १७ जानेवारी रोजी पहाटे या पथकाने ओसरगांव नवीन टोलनाका येथे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी कार (एम एच ०७ एस ४४५५) तपासणीसाठी थांबवून तपासली असता कारमध्ये १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारुचे ४६ बॉक्स आणि अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ५ लाख ८0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी तेजस दिनेश गिरी (२६, रा. माठेवाडा सावंतवाडी) व आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (२७ रा. सातार्डा, सावंतवाडी) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालक जे. आर. चव्हाण यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.