निवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम तातडीने द्या : संदेश पारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 03:41 PM2021-02-25T15:41:20+5:302021-02-25T15:42:55+5:30
BankingSector Sindhudurg Sandeshparkar-सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सन २००९ पासून त्यांची येणे बाकी रक्कम मिळालेली नाही. साडेतेरा कोटींची ही रक्कम या कर्मचाऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले.
कणकवली : सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सन २००९ पासून त्यांची येणे बाकी रक्कम मिळालेली नाही. साडेतेरा कोटींची ही रक्कम या कर्मचाऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, साडेतेरा कोटींची थकीत देय रक्कम मिळावी यासाठी सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. मात्र, त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.
दरम्यान, २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांची देणी ही भूविकास बँकांची स्थावर मालमत्ता विक्री करून किंवा येणे कर्ज रक्कम वसूल करून अदा करावी, असे नमूद आहे. परंतु, सिंधुदुर्ग जिल्हा भूविकास बँकेची कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही. अगर पुरेशी कर्ज येणे बाकी नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग भूविकास बँक निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवू शकत नाही, अशी स्थिती आहे.
जिल्हा भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी राज्यातील भूविकास बँकांकडे शिल्लक असलेल्या निधीमधून विशेष बाब म्हणून रक्कम दिली जावी. त्याबाबत मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा. अशीही मागणी पारकर यांनी केली. दरम्यान, आपल्या मागणीची दखल घेऊन मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर बैठक लावण्याचे आश्वासन सहकारमंत्री पाटील यांनी दिल्याचे पारकर यांनी सांगितले.