हलगर्जीपणामुळे गोपनीय प्रेसवर दंडात्मक कारवाई?
By admin | Published: March 13, 2015 11:29 PM2015-03-13T23:29:31+5:302015-03-13T23:55:34+5:30
प्रश्नपत्रिका गोंधळ : चौकशी होणार; पॅकिंग प्रक्रियाही सदोष असल्याची शंका
रत्नागिरी : दहावी परीक्षेमध्ये अपुऱ्या प्रश्नपत्रिकांचा गोंधळ चिपळूण, रत्नागिरी पाठोपाठ आता सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कसाल, कुडाळ केंद्रांवर ही पोहोचला आहे. गोपनीय प्रेसच्या हलगर्जीपणामुळेच प्रश्नपत्रिका अपुऱ्या पडण्याचा गोंधळ निर्माण झाला असल्याने चौकशी करून त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे सचिव एस. गिरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अर्थात प्रेसचे नाव घेतले जात असले, तरी पेपर पॅकिंगचे काम परीक्षा मंडळाच्या मार्गदर्शनातच होते. त्यामुळे पॅकिंग करताना झालेल्या गोंधळाची जबाबदारी कोणावर निश्चित केली जाणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
चिपळूणमध्ये व रत्नागिरीमध्ये दहावीच्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिका कमी प्राप्त झाल्या. पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अपुऱ्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती काढून वितरित करण्यात आल्या.
प्रत्येक शाळांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेतल्यानंतर जिल्हानिहाय माहिती कोकण बोर्डाच्या परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात येते. त्यानुसार परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थी संख्येनुसार पेपर वितरित करण्यात येतात. अधीक्षक, स्थायी कर्मचारी, ज्येष्ठ कारकून, परीक्षकांच्या उपस्थितीत पेपर पॅकिंग करून पाठविले जातात. त्यानुसार कोकण बोर्डाच्या रत्नागिरी कार्यालयाकडे दोन टप्प्यांत पेपर उपलब्ध झाले. मात्र, संबंधित विषयांचे पेपर पॅकिंग परीक्षेच्याच दिवशी परीक्षा केंद्रावर उघडण्यात येतात. त्यानुसार पेपरचे वितरण केले जाते. चिपळूणमध्ये संयुक्त हिंदीचा पेपर असताना हिंदी पेपर क्रमांक २ व ३ चे पेपर उपलब्ध झाले. शिर्के हायस्कूलमध्ये हिंदीऐवजी संयुक्त हिंदीचे पेपर आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमितीच्या पेपरप्रसंगी पॅकिंगवर इंग्रजी माध्यम लिहिले असताना आतमध्ये मराठी माध्यमांचे भूमितीचे पेपर आढळले. परीक्षेचे पेपर भरताना केलेल्या चुकीमुळे पेपर विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे प्राप्त झाले नाहीत. परिणामी ऐनवेळी धावाधाव करावी लागली, असेही एस. गिरी यांनी सांगितले.
शाळानिहाय, केंद्राप्रमाणे विद्यार्थी संख्या, माध्यम, संपूर्ण माहिती परीक्षा मंडळाकडे कळविली जाते; परंतु पेपर भरताना केलेल्या चुकीमुळे पेपर कमी प्राप्त होत आहेत. वास्तविक पेपर पॅकिंगचे काम कडेकोट बंदोबस्तात केले जाते. स्थायी कर्मचारीच पॅकिंग करीत आहेत.
पेपरच्या पार्सलवर लिहिल्याप्रमाणे आत पेपर असणे आवश्यक आहे; परंतु तसे नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे. शिवाय पेपरच्या दिवशी केंद्रावर पेपर पार्सल उघडल्यानंतर संबंधित प्रकार निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी