चार ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई

By admin | Published: May 5, 2015 10:22 PM2015-05-05T22:22:45+5:302015-05-06T00:17:53+5:30

मालवण तहसीलदारांचा आदेश : सागरी अधिनियमांचे उल्लंघन

Penal action on four trawlers | चार ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई

चार ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई

Next

मालवण : सागरी अधिनियमांचे उल्लंघन करून मालवणच्या समुद्रात ४ ते ५ वावात पर्ससीनद्वारे मच्छिमारी करणाऱ्या गोवा आणि रत्नागिरी येथील सहा ट्रॉलर्सवर कारवाई करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने प्रतिवेदने दिल्यानंतर मंगळवारी मालवण तहसीलदारांनी चार ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई केली तर दोन ट्रॉलर्सची आवश्यक ती कागदपत्रे सादर केली गेल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही.दरम्यान, गोव्याच्या पर्ससीन तीन ट्रॉलर्सना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा तर रत्नागिरी-साखरी नाटे येथील एका ट्रॉलर्सला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोव्याच्या ट्रॉलर्सनी मालवणच्या समुद्रात पडलेली मच्छिमारी जाळी शोधण्याची मोहीम हाती घेतली.
रविवारी सायंकाळी मालवणच्या समुद्रात ४ ते ५ वाव पाण्यात पर्ससीनद्वारे मच्छिमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा पाठलाग करीत स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी सहा ट्रॉलर्स पकडले होते. या प्रकारात पर्ससीन ट्रॉलर्स व पारंपरिक मच्छिमार यांच्यात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर प्रांतवादात झाले होते. त्याचे पडसाद गोवा राज्यातही उमटले.
पारंपरिक मच्छिमारांनी पकडलेले हे सहा ट्रॉलर्स मालवण धुरीवाडा येथील समुद्रात उभे करून ठेवण्यात आले होते. यातील चार ट्रॉलर्सनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी या सहाही ट्रॉलर्सवर कारवाई करण्याच्या दृष्टीने मालवणच्या मत्स्य व्यवसाय विभागाने तहसील कार्यालयात प्रतिवेदने सादर केली होती. ही कारवाई मालवण मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे यांनी केली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ नुसार करण्यात आलेल्या कारवाईत साखरीनाटे रत्नागिरी येथील सफवान बशीर पंगेरकर (ट्रॉलर्सचे नाव - महम्मद सन्ननान), मोहम्मद शफसद्दीन वाडकर (ट्रॉलर्सचे नाव -अलअमीर), आसिफ महम्मद म्हसकर (टॉलर्सचे नाव - महम्मद अमीर अयुब) तसेच गोवा येथील फ्रान्सीस फर्नांडिस व लॉरेन्स पिंटो (ट्रॉलर्सचे नाव - सेंट फ्रान्सीसा), ब्राझिलिया फर्नांडिस (ट्रॉलर्सचे नाव - सेंट अ‍ॅन्थोनी) आणि आयवो डिसिल्व्हा (ट्रॉलर्सचे नाव - ए. एम. सिल्व्हा) यांच्या विरूद्ध प्रतिवेदने सादर करण्यात आली.
मंगळवारी मालवणचे प्रभारी तहसीलदार खडपकर यांच्यासमोर या सहाही पर्ससीन ट्रॉलर्स मालकांची सुनावणी झाली. या सुनावणीत आसिफ म्हसकर आणि मोहम्मद वाडकर यांनी मच्छिमारी करण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सादर केल्याने या दोघांना दंड ठोठावण्यात आला नाही तर सागरी नाटे येथील सफवान पंगेरकर यांनी कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
गोवा येथील ट्रॉलर्स मालकांजवळ महाराष्ट्रात मच्छिमारी करण्याचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे गोवा येथील फ्रान्सीस फर्नांडिस, ब्राझिलिया फर्नांडिस आणि आयव्हो डिसिल्व्हा यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड सायंकाळी भरण्यात आला.
पोलीस संरक्षणात ट्रॉलर्स मालक
मालवणच्या समुद्रात रविवारी पर्ससीन ट्रॉलर्स व पारंपरिक मच्छिमार यांच्यात सी वॉर घडल्यानंतर सिंधुदुर्गसह गोवा राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर गोव्याच्या मत्स्य व्यवसाय अधिकारी, पोलीस अधिकारी व संबंधित ट्रॉलर्स मालकांची बैठक घेतली. त्यानुसार या ट्रॉलर्स मालकांना पोलीस संरक्षण देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी गोव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन नाईक यांच्या नेतृत्वाखाली सहा पोलिसांचे पथक मालवणात दाखल झाले. या पोलीस पथकासमवेत ट्रॉलर्स मालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)


पोलीस निरीक्षकांकडून कानउघाडणी; फाटक्या जाळ्यामुळे तणाव
मंगळवारी मत्स्य विभागाने कारवाई केलेल्या सहाही पर्ससीन ट्रॉलर्सचे मालक मालवणात दाखल झाले. या ट्रॉलर्स मालकांनी मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बुलबुले यांनी या ट्रॉलर्स मालकांची कानउघाडणी करताना यापुढे सागरी अधिनियमांचे उल्लंघन करू नये तसेच केल्यास कारवाई करू असे सांगितले.
रविवारी मालवणच्या समुद्रात गोवा, रत्नागिरीचे पर्ससीन ट्रॉलर्स आणि स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्यात जे ‘सी वॉर’ घडले त्यानंतर प्रांतवाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आला. या प्रांतवादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने गोवा आणि सिंधुदुर्गच्या मच्छिमारांची समन्वय बैठक घेण्यात यावी असे सोमवारी ठरविण्यात आले होते. तशा आशयाचे संदेश मत्स्य व्यवसाय आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी मालवण पोलीस ठाण्यात समन्वय बैठक झाली. मात्र, मालवणच्या मत्स्य व्यवसाय विभागाला त्याची माहितीच नव्हती.
मालवणच्या समुद्रात रविवारी घडलेल्या सी वॉर दरम्यान पर्ससीन ट्रॉलर्सवरील जाळी समुद्रात टाकण्यात आली होती. मंगळवारी पर्ससीन ट्रॉलर्स मालक दाखल झाल्यानंतर झालेल्या समन्वय बैठकीत या जाळ्यांचा मुद्दा चर्चिला गेला. या चर्चेत ट्रॉलर्स मालकांनी पारंपरिक मच्छिमारांची जाळी तोडल्याचा आरोप केला. या आरोपामुळे जाळ्यांचा शोध घेत असताना काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र हा तणाव काही काळाचाच राहिला. रात्री उशिरापर्यंत गोव्याचे ट्रॉलर्स समुद्रात जाळ्यांचा शोध घेत होते.

Web Title: Penal action on four trawlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.