सदोष सेवेपोटी गणेशकृपा डेव्हलपर्स यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:45 PM2017-10-04T12:45:21+5:302017-10-04T12:50:43+5:30
त्रुटीपूर्ण व्यवहार करुन सदोष सेवा दिल्याप्रकरणात कणकवलीतील गणेशकृपा डेव्हलपर्स यांना दंड देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला. गणेशकृपा डेव्हलपर्सचे दोन्ही भागीदार यांनी संयुक्तपणे दंड देण्याचा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रदीप निटरकर व सदस्य डॉ. अशोक सोमवंशी व श्रीमती वफा खान यांनी दिला.
सिंधुदुर्गनगरी दि. 04 : त्रुटीपूर्ण व्यवहार करुन सदोष सेवा दिल्याप्रकरणात कणकवलीतील गणेशकृपा डेव्हलपर्स यांना दंड देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला.
ग्राहक मंचाने गणेशकृपा डेव्हलपर्सचे भागीदार राजेंद्र माने व गिरीष नाळे यांच्याविरुध्द निकाल देवून योगेश ढवण यांना 60 दिवसांचे आत आनंदरंग रेसिडेन्सीमधील सदनिका क्र. 102 चे खरेदीखत करुन द्यावे. खरेदीखत करुन न दिल्यास योगेश ढवण यांचेकडून घेतलेली संपूर्ण रक्कम रुपये 15 लाख 93 हजार 500 तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजे दिनांक 07 डिसेंबर 2016 पासून प्रत्यक्ष रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे 12 टक्के व्याज दराने परत करावी. तसेच या संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाख व मंचात तक्रार दाखल करण्याच्या खर्चाचे रुपये 10 हजार गणेशकृपा डेव्हलपर्सचे दोन्ही भागीदार यांनी संयुक्तपणे किंवा पृथकत: द्यावे असा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रदीप निटरकर व सदस्य डॉ. अशोक सोमवंशी व श्रीमती वफा खान यांनी दिला.
या बाबत सविस्तर माहिती अशी योगेश गणेश ढवण व इश्वरी योगेश ढवण रा. हरकूळ ता. कणकवली या उभयतांनी गणेशकृपा डेव्हलपर्स, कणकवली यांच्याकडून आनंदरंग रेसिडेन्सी मध्ये 595 चौ. फूट क्षेत्रफळाची सदनिका क्र. 102 रुपये 15 लाख 89 हजार इतक्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा साठेकरार दिनांक 20 जानेवारी 2016 मध्ये केला. सदनिका 4 ते 5 महिन्यात तयार होईल असे डेव्हलपर्सनी आश्वासन दिले होते. परंतु डिसेंबर 2016 पर्यंतही सदनिकेचे बांधकाम गणेशकृपा डेव्हलपर्स यांनी करुन दिले नाही म्हणून योगेश ढवण यांनी राजेंद्र रंगराव माने व गिरीष आनंदराव नाळे या भागीदारांविरुध्द सिंधुदुर्ग ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
तक्रारकर्ते ढवण यांनी गणेशकृपा डेव्हलपर्सला सारस्वत बँक शाखा कणकवली येथून रुपये 14 लाख 15 हजार इतक्या रकमेचे कर्ज काढून पैसे दिले. तसेच इतर खर्चाचे पोटी 1 लाख 78 हजार 500 असे एकूण रुपये 15 लाख 93 हजार 500 इतकी रक्कम दिली. तरीही विरुध्द पक्ष गणेशकृपा डेव्हलपर्स यांनी तक्रारकर्त्याला रुपये 4 लाख 10 हजार इतक्या रकमेची अवास्तव मागणी करुन तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण व्यवहार करुन सदोष सेवा दिली.
00000