कोकण मंडळ इमारत प्रश्न प्रलंबित
By admin | Published: March 30, 2015 10:33 PM2015-03-30T22:33:34+5:302015-03-31T00:22:15+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा : पहिल्या सभेत विचारला गेला होता प्रश्न
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय गेली तीन ते चार वर्षे भाड्याच्या इमारतीमध्ये भरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळूनदेखील इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मंडळ सदस्यांच्या पहिल्या तदर्थ सभेमध्ये याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु याबाबत अंमलबजावणी झाली नाही.विशेष बाब म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोकण विभागीय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र आर्थिक तरतूद केली असल्याचे सांगितले जाते. कोकण मंडळासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून काजरघाटी धार या ठिकाणी जागा मंजूर झाली आहे. ही जागा आता मंडळाच्या ताब्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली जागा मंडळाच्या ताब्यात येऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनदेखील अद्याप या जागेला संरक्षक कठडादेखील बांधण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यापलिकडे कोणतेही विशेष काम आजपर्यंत झालेले नाही. याबाबत विभागीय मंडळात विचारणा केली असता बांधकाम करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य मंडळाकडे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विभागीय मंडळाकडून याबाबत पाठपुरावा होऊनदेखील राज्य मंडळाच्या संमतीशिवाय बांधकाम सुरु होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.सध्या विभागीय मंडळ भाड्याच्या जागेमध्ये चालू आहे. या जागेसाठी मंडळाला प्रतिमहिना १,७५,००० रुपये भाडे द्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाड्याची रक्कम मोजावी लागत असल्याने अगोदरच आर्थिकदृष्ट्या तोट्यात असणाऱ्या मंडळाला हा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यासाठी लवकरात लवकर स्वत:च्या मालकीची इमारत उभी करण्यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंडळाने या सर्व गोष्टीची दखल घेऊन इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा व जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिल्यानंतरही त्या जागेबाबत कोणतीच हालचाल करण्यात येत नसल्यामुळे काहिंनी नाराजी व्यक्त केली. काजरघाटी येथील जागा मंडळाच्या ताब्यात आहे. मात्र, तेथे इमारतीचे बांधकाम कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. भाड्यापोटी दर महिन्याला द्यावे लागणारे पैसे इमारत झाल्यास टळू शकतील. (वार्ताहर)
नवीन जागेमध्ये कोकण विभागीय मंडळाच्या मालकीची इमारत उभी करण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून प्रक्रिया सुरु आहे. राज्य अध्यक्ष गंगाधर म्हणाणे यांनी जागेची पाहणी केली आहे. बांधकामाची प्रक्रिया सुरु होईल.
- व्ही. व्ही. गिरी.