प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत जमिनीला हात लावू देणार नाही : राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:26 PM2018-12-05T16:26:23+5:302018-12-05T18:13:43+5:30
ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली.
लांजा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाले पाहिज,े ही भावना आहेच. मात्र लांजा शहरातील उध्वस्त होत असलेल्या नागरिक, व्यापारी, खोकेधारक, दुकानदार व सर्व इमारत मालक या सर्वांचे न्यायालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली.
सोमवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी लांजा शहरामध्ये महामर्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शहरातील व्यापाºयांनी काम न करु देता पिटाळून लावले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील वादावादीची दखल त्याक्षणी आमदार राजन साळवी यांनी घेउन व्यापाºयांच्या पाठीशी राहण्याची भुमिका घेतली होती.
कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून काम बंद ठेवण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. यासह ४ डिसेंबर २०१८ रोजी लांजा शहरातील नागरीक, व्यापारी व महामार्ग अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांची एक संयुक्त सभा घेण्याचे आश्वासन साळवी यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी ही सभा शहरातील सांस्कृतीक भवन लांजा येथे नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि अधिकाऱ्यांच्या उत्तराने दीड ते दोन तास सुरू होती. या सभे प्रसंगी आमदार राजन साळवी बोलत होते.
या सभेला संघर्ष समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी, व्यापारी संघटनचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नगराध्यक्ष सुनिल कुरूप, परवेश घारे, जयवंत शेट्ये, जगदीश राजापकर, संदीप दळवी, हेमंत शेट्ये, रुपेश गांगण, सचिन भिंगार्डे, खलिल मणेर, सुरेंद्र लाड, महेश नारकर, अनिल लांजेकर, प्रभाकर शेट्ये आदी उपस्थित होते.
आमदार राजन साळवी लांजा शहरातील प्रकल्पबाधित व्यापारी व नागरिकांशी बोलताना पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने लांजा शहरातील अनेक खोकेधारक, दुकानदार, इमारती मालक हे सर्व उध्वस्त होत असल्याचे समोर आल्यानतर या मार्गाला बायपास मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र लांजा शहर जिथे सुरू होते व व शहराचा शेवट जिथे संपतो, त्यावरती पुल होणार हे महामार्ग प्रशासनाने समोर ठेवले.
मात्र महामार्ग प्रशासनाने शहरातील नागरीक, खोकेधारक, व्यापारी यांच्या समस्या, प्रश्न व ज्यांना मोबदला मिळाला नाही, ज्यांचा अर्धवट मिळालेला आहे, अशा सर्व प्रकल्प बाधितांना पुर्णत्वाला केल्याशिवाय शहरात कामाला सुरूवात करु नये नाहीतर जनतेस रस्यावर उतरुन शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.
या सभेला महामार्ग चौपदरिकरणाचे अधिकारी, प्रांतकार्यालयाचे प्रतिनिधी, महामार्ग ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम, महावितरण या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच व्यापारी आणि नागरिकांच्यावतीने संघर्ष समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना महामार्गाच्या वेळोवेळी बदलत असणाऱ्या जागा हस्तांतरणाबाबत चांगलेच धारेवर घेतले होते.
नागरीक व व्यापारी यांच्यावतीने बोलताना महंमद रखागी म्हणाले की, ३० ते ४० वषार्पासून छत्री डोक्यावर घेउन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. आज तेच सर्व महामार्गात उध्वस्त होत आहेत. शहराची बाजारपेठ रस्त्यावरच आहे. आज उध्वस्त होणाऱ्यांकडे अन्य कोणाताही रोजगारदृष्ट्या दुसरा पर्याय नाही, असे असतानाही कोणतीच माहिती नाही.
एकाएकी नोटीसा येतात, त्यामध्ये मोबदला, जागा किती घेतली जातेय, नेमकी शहरात मार्ग कसा असणार हे निश्चित नाही आणि नोटीसा पाठवून व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेशी खेळण्याचे काम महामार्ग प्रशासन करत आहे, असे ते म्हणाले.
नळपाणी योजनेवर चर्चा
सभेत लांजा नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेचा विषयावर चर्चा करण्यात आली. महामार्ग प्रशासनाने नुकसान भरपाई म्हणून नगरपंचायतीला देऊ केलेली रक्कम पुरेसी नसून ती वाढीव स्वरुपाने मिळावी, असे उपस्थित अधिकाºयांना नगराध्यक्ष सुनिल कुरुप व परवेश घारे यांनी ठणकावून सांगितले. शहराचा वाढता आलेख आणि अल्प मोबदला यावर महामार्ग प्रशासनाने विचार करावा असे सांगण्यात आले.