कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Published: June 5, 2024 04:13 PM2024-06-05T16:13:47+5:302024-06-05T16:14:13+5:30

काहीजणांचा हिशोब व्याजासहित चुकता करणार

People expelled Uddhav Sena from Konkan says MLA Nitesh Rane | कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

कणकवली : गेल्या १० वर्षात विकास कामे न केल्याने विनायक राऊत यांना लोकांनी ठरवून घरी बसवले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गेली ४० वर्षे आपले सर्वस्व पणाला लावत सिंधुदुर्गवासियांची सेवा केली. त्यामुळे जनतेने मतदानाच्या रुपाने त्यांना आशिर्वाद दिले आहेत. तर येथील विकास करू शकणाऱ्या प्रकल्पांना कायम विरोध करणाऱ्या उध्दवसेनेला जनतेने कोकणातून हद्दपार केले आहे. असे सांगतानाच काहीजणांचे हिशोब चुकते करायचे असून आगामी काळात ते व्याजासहीत चुकते केले जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राणे म्हणाले, आता रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार निवडून आला आहे. गेल्या वर्षभरात भाजपाचे नेते सातत्याने सांगत होते. ते म्हणजे यापुढचा खासदार हा कमळ या चिन्हाचा असेल. कारण येथील जनतेने ठरवेल होते. विनायक राऊत यांना घरी बसवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले समर्थन देण्यासाठी जनतेने हा निकाल दिला आहे. त्यामुळे या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. 

दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले 

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालक कसा असावा? हे समजते. एक नेतृत्व काय करु शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपा पक्ष आणि महायुती कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. त्यामुळे यश प्राप्त झाले आहे. या निकालात मॅन ऑफ द मॅच देण्यासारखे काम शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले आहे. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. तसेच महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि त्यांचा पक्ष आमच्या पाठीशी राहिला आहे. 

उद्धवसेनेच्या अदृश्य हातांचे आभार 

परंतु या निवडणूकीत काही कटू अनुभव आले. त्याची चर्चा महायुतीच्या बैठकीत होईल. महायुतीच्या नेत्यांनी उद्धवसेनेला  या मतदार संघात राजकीय शत्रू समजून काम केले पाहिजे. अन्यथा महायुतीकडे ताकद असून देखील पुढील निवडणुका अवघड जातील. उद्धवसेनेच्या अदृश्य हातांचे मी आभार मानतो, त्यांच्या  मदतीमुळे आमचा हा विजय सुकर झाला. बाळासाहेबांना मानणा-या शिवसैनिकांनी  राणेंना मदत केली. आता जिल्ह्यातील उद्धवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की पक्ष राहतो, हे यापुढे आम्हाला कळेलच.

लोकसभेत या मतदार संघात ४२ हजारांचे लीड दिले त्याबद्दल समाधान व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा झाली. त्यात आम्हाला त्यांनी शिव्या शाप दिले तेव्हाच मी सांगितले होते की, मतदार त्याचा वचपा काढतील. ते या निकालातून दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत ३० हजाराचे लीड मला होते ते ४२ हजार झाले आहे. 

वैभव नाईकांचा पराभव अटळ!

वैभव नाईक यांच्या मतदार संघात आम्हाला मिळालेल्या मताधिक्याने पुन्हा एकदा कुडाळ आणि मालवण मध्ये जनता राणे आणि भाजपच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा पराभव अटळ असल्यानचेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Web Title: People expelled Uddhav Sena from Konkan says MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.