बोलघेवडेपणा केल्याने जनतेने नाकारले
By admin | Published: November 9, 2015 10:53 PM2015-11-09T22:53:45+5:302015-11-09T23:25:46+5:30
सतीश सावंत : प्रमोद जठारांवर केला आरोप
कणकवली : प्रमोद जठार यांनी आमदारकीच्या पाच वर्षांत फक्त बोलघेवडेपणा करत जनतेची दिशाभूल केली. नुुसत्या पोकळ घोषणा करणाऱ्या जठार यांनी प्रत्यक्षात काही न केल्यामुळे त्यांना येथील जनतेने नाकारले. त्यामुळे जठारांनी आमदार नीतेश राणे यांना सल्ला न देता आत्मपरीक्षण करावे, अशी टीका कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात सतीश सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जठार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
सतीश सावंत पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी लाटेत देशात सरकार आल्याची घमेंड केली जात होती. मात्र, अशी घमेंड करणाऱ्यांची बिहार येथील निवडणुकीत चांगलीच जिरली आहे. आता बदलेल्या वातावरणाचा आणि मोदी लाट उतरल्याचा जठार यांनी विचार करावा. आता आनंदवाडी प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याचे सांगत असले तरी त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकालात जठार यांनी देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला विरोधच केला. नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कासार्डे येथील एमआयडीसीसाठी जमिन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याला प्रमोद जठार यांनी विरोध केला. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना विरोध करत जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला विरोध करण्याचे काम केल्याचे सतीश सावंत म्हणाले. माजी आमदार जठार ज्या देवगड मतदारसंघातील पाणीप्रश्नाबाबत सांगत आहेत. त्या देवगड मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपाचा आमदार होता. तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी आपल्या कार्यकाळात कोणते प्रयत्न केले हे जठार यांनी सांगावे.
प्रमोद जठार यांनी स्वत:च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावर कासार्डे येथे डेअरी प्रकल्प आणला आणि आता तो बंद करण्यात आला आहे. असे दिशाभूल करण्याचे राजकारण करण्यात प्रमोद जठार यांचा हातखंडा आहे. नारायण राणेंनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्याकडून विविध प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न झाले. मात्र न सुरू झालेल्या प्रकल्पांना जठार यांच्यासारख्यांचा विरोध जबाबदार आहे. देशात १८ महिने आणि राज्यात वर्षभर युतीचे सरकार आहे. या काळात सरकारने देशातील जनतेला महागाई दिली. आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा जिल्ह्यातील स्वत:च्या दु:स्थितीचा भाजपाने विचार करावे व मगच आमदार नीतेश राणे यांना सल्ला द्यावा, असे सतीश सावंत
म्हणाले. (प्रतिनिधी)
जठारांचा हास्यास्पद आरोप : सतीश सावंत
नारायण राणे यांनी हॉटेल वाचवण्यासाठी गडकरी यांची भेट घेतल्याचे जठार सांगत आहेत. मूळात अशा गोष्टींना गडकरी साथ देतात का? हे जठार यांनी जाहीर करावे. रस्त्याच्या दुतर्फा राणे यांचीच जागा आहे. रस्ता कुठेही हलवला तरी त्यांचीच जागा जाणार आहे. चौपदरीकरणाच्या अटीशर्तींचे पालन करूनच हॉटेल बांधण्यात आले असल्याने आरोप हास्यास्पद असल्याचे सावंत म्हणाले.