शिवसेनेने काय केले आहे हे जनतेला माहीत आहे, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:38 PM2019-04-18T22:38:09+5:302019-04-18T22:38:56+5:30
शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठावूक आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कणकवली येथे झालेल्या प्रचारसभेमधून विरोधकांना लगावला.
कणकवली - शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठावूक आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कणकवली येथे झालेल्या प्रचारसभेमधून विरोधकांना लगावला.
कणकवली येथील प्रचारसभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच मतदार संघात पहिली सभा झाल्यानंतर देखील दुसऱ्या सभेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठावूक आहे. विरोधकांनी जर पुन्हा आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ठेचून काढू. आमच्याकडे आता असे पुरावे आहेत की आम्ही तुम्हाला पुरून टाकू, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. कोकणचा विकास पर्यावरण अबाधित ठेवून मी करून दाखवीन, असे आश्वासनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे
- काही लोक म्हणतात शिवसेनेने काय केलं. आम्ही काय केलं हे जनतेला माहिती आहे.
- या मतदारसंघाला मधु दंडवते आणि सुरेश प्रभू यांची परंपरा
- साठ वर्ष सत्तेत राहून माजलेली काँग्रेसची लोक या पाच वर्षात सुधारतील का ?
- बाळासाहेब ठाकरे हे प्रमोद महाजन यांना बोलले होते की एक दिवस या देशात हिंदू हिंदुत्वासाठी मतदान करेल
- नेहरूजींची कोठडी बघा आणि सावरकर यांची कोठडी बघा. राहुल गांधी तुम्ही एक दिवस सावरकर यांच्या कोठडीत रहा आणि मग सांगा
- कोकणचा विकास पर्यावरण अबाधित ठेवून मी करून दाखवीन