चिपी विमानतळाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, केवळ उद्घाटना पुरताच संबंध; मनसे नेते परशुराम उपरकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:03 PM2022-05-24T17:03:50+5:302022-05-24T17:05:46+5:30
विमानतळावरील गैरसोयींकडे ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत आहेत. केवळ उद्घाटना पुरताच यांचा विमानतळाशी संबंध होता,
कणकवली : श्रेयवादात अडकलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे अखेर पूर्णत्वास गेले आहे. परंतु सहा महिने होत आले तरीही विमानतळावरील गैरसोयींकडे ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत आहेत. केवळ उद्घाटना पुरताच यांचा विमानतळाशी संबंध होता, अशी टीका मनसे सरचिटणीस परशराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे पर्यटनासाठी इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे पर्यटकांची येथे गैरसोय होत आहे. देवगडमधून निघालेला एखादा प्रवासी असेल तर त्यांना खाद्य पदार्थ किंवा एखादी पाण्याची बाटलीही मिळत नाही. ही खरेच शोकांतिका आहे.
तसेच विमानामध्ये खाद्य पदार्थ विकतही दिले जात नाहीत. त्यामुळे चार ते साडेचार तास प्रवाशांना उपाशी प्रवास करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. याकडे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. केवळ विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले हेच ते जनतेला दाखवत आहेत.
राज्य सरकारने विमानतळासाठी वीज, पाणी, रस्ता या सोयी पूर्ण करण्याचे करारामध्ये लिहिले आहे. परंतु त्या सोयीदेखील पूर्ण केल्या गेल्या नाहीत. चार वर्षांपूर्वी तेजस एक्सप्रेस मध्येही खाद्य पदार्थ दिले जात नव्हते. या विषयी रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठपुरावा केल्यानंतर चिपळूणच्या पुढे खाद्य पदार्थ देण्यास सुरुवात झाली. या साऱ्या गोष्टींचा पर्दाफाश आम्ही लवकरच करणार आहोत, असा इशारा परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.