निशाण तलावातील लोकसहभागातून गाळ काढणार
By Admin | Published: May 29, 2016 12:17 AM2016-05-29T00:17:50+5:302016-05-29T00:18:28+5:30
वेंगुर्लेवासीय एकत्र : ३0 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामास प्रारंभ करणार
वेंगुर्ले : ब्रिटीश काळात वेंगुर्ले शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात पाण्याचा थेंब साठत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या तलावाचे निकृष्ट बांधकाम केले. या मालमत्तेवर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने उन्हाळी पाणी टंचाई झळ तीव्र झाली. त्यामुळे शनिवारी लोकसहभागातून या तलावाचा गाळ काढणे व परिसराची साफसफाई करण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले.
यावेळी युवाशक्ती प्रतिष्ठान, नागरी कृती समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून काम करण्याचा निर्णय विलास गावडे यांनी जाहीर केला. मात्र, या संंदर्भात प्रथम जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व चर्चा करुनच हे काम केले जाणार आहे. त्यानुसार ३0 मे रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला.
वेंगुर्ले शहरात उन्हाळी पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याने व शासनस्तरावर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी निशाण तलाव व नारायण तलाव या महत्वाच्या जलस्तोत्राबाबत पाठपुरावा करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वेंंगुर्लेतील नागरिक लोकसहभागातून नारायण तलावाचा गाळ काढणे व स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले.
शनिवारी वेंगुर्लेतील नागरिकांनी घेतलेल्या निर्णयास पूर्ण सहभाग व पाठींबा देण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे, नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजे, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, राजन गिरप, प्रदीप वेंगुर्लेकर, वैभव गावडे, अनुप गावडे, कृष्णा गांवकर, समाधान बांदवलकर, गिरगोल फर्नांडिस, श्रीराम कांदळगांवकर, गणपत चोडणकर, अंकुश मलबारी, श्रीकांत रानडे, सतेज मयेकर, महेश गांवकर, मंगेश मलबारी आदी प्रमुख नागरीकांच्या झालेल्या चर्चेत हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सध्या ताब्यात असल्याने व नगरपरिषद गेली १० वर्षे या तलावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांची येत्या ३0 मे सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करुन तलावाच्या साफसफाईचा व गाळ काढण्याचा निर्णय निश्चित करु व ५ ते ६ दिवसांत गाळ व साफसफाईचे काम लोकसहभागातून पूर्ण करुया, असे आश्वासन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी दिले. सोमवारी ७ जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांचेकडे या तलावाच्या गाळ काढणे व स्वच्छतेच्या लोकसहभागातील कामासाठी भेट घेईल असेही स्पष्ट करण्यात आले.
नारायण तलावाची दक्षिणेकडील भिंत ही या धरणासाठी फार महत्वाची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या धरणाच्या खोदाईत दक्षिणेकडील भिंतीची ५ फूट तलाव खोली केली. त्यावेळी त्या ५ फूटाचे बांधकाम भक्कम व मजबूत स्वरुपात केले नसल्याने पाणी पाझरुन ते वाहून जाते. या तलावाच्या उर्वरीत भिंतीचे बांधकाम करण्यापेक्षा दक्षिणेकडील धरणाची मुख्य भिंत ही नवीन व मजबुतीने बांधल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल, असे ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
वेंगुर्ले शहरात ओल्या, सुक्या, लोखंडी, काच व प्लॅस्टीक कच-याच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले आहे असे असताना नारायण तलाव व परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही का? शासन जलस्तोत्र विकासास सर्वप्रथम प्राधान्य दिले असे असताना नगरपरिषदेचे नारायण तलावाकडे दुर्लक्ष ही बाब गंभीर असल्याचे स्थानिक नागरीकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)