युतीच्या नेत्यांवर जनता आता विश्वास ठेवणार नाही ! शिवसेनेची विश्वासार्हता संपली--नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 08:42 PM2019-02-20T20:42:52+5:302019-02-20T20:46:20+5:30
गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध निवडणुकांच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेची भांडणे जनतेने पाहिली आहेत. अशा स्थितीत या पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा युती केली आहे. मात्र ,
कणकवली : गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध निवडणुकांच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेची भांडणे जनतेने पाहिली आहेत. अशा स्थितीत या पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा युती केली आहे. मात्र , शिवसेनेची विश्वासार्हता संपली असून जनता आता त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवणार नाही.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार नितेश राणे पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राने सोमवारी ' अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट शिवसेना- भाजपच्या युतीच्या निमित्ताने पाहिला. त्यातील सगळे मुख्य कलाकार गेली पाच वर्षे एकमेकांचे हात धरून जनतेला फसविण्याचे काम करीत होते. त्यांचे खरे चेहरे आता जनतेसमोर आले आहेत.
बंदुकीची गोळी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द सारखा होता. गोळी प्रमाणे एकदा तो सुटला की परत मागे येत नसे. मात्र, आता उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तसे होत नाही. अण्णा हजारे यांचे उपोषण , राखी सावंत हिची पत्रकार परिषद आणि उद्धव ठाकरे यांचा शब्द याला आता काही किंमत उरलेली नाही.
'पहिले मंदिर ,फीर सरकार' असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याचे आता काय झाले? राम मंदिर बांधून झाले आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा असे भाजपाला सांगणाऱ्या ठाकरे यांनी स्वतः किती प्रश्न सोडविले? हे त्यांनी सांगावे.
नाणार रिफायनरी प्रकल्पाची जागा बदलणार असे सोमवारी जाहीर करण्यात आले. मात्र , गेली पाच वर्षे वारंवार' यु टर्न' घेणाऱ्यांच्या नावातच ' यु' व ' टी' आहे. त्यामुळे त्यांनी याबाबतीतही आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे. त्यांच्या या बोलण्यावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा? निवडणूक झाल्यावर ते आपला शब्द तर बदलणार नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होतो.
अधिवेशनात मुख्यमंत्र्यानी नाणारचे भूसंपादन थांबवितो असे सांगितले होते. परंतु त्यानंतर पानिपतचा दौरा कसा झाला? सुकठणकर समितीच्या दौऱ्याला मान्यता कशी मिळाली? हे जनतेला सांगावे . त्यामुळे नाणार रद्द करणार किंवा हलविणार असे जे सांगितले जात आहे.ते लिखित स्वरूपात जनतेसमोर आणावे. निवडणुकीच्या तोंडावर दिलेले आश्वासन असे याबाबतीत होऊ नये. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर यापुढील निवडणुका लढेल. तसेच शिवसेना- भाजप युतीचा फायदा स्वाभिमान पक्षाला होईल. निवडणुकीच्या या रणसंग्रामात सर्वच पक्षाच्या तिकीट न मिळणाऱ्या नेत्यांनी आम्हाला संपर्क करावा. उमेदवार योग्य असेल तर त्याला निश्चित संधी दिली जाईल.
लोकसभेसाठी निलेश राणे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत. युतीचे नेते एकत्र आले तरी त्यांचे कार्यकर्ते पक्षाचे काम करणार नाहीत.कडवट शिवसैनिक ही युती स्वीकारणार नाहीत. त्यामुळे स्वाभिमान पक्षालाच त्याचा फायदा होईल. नाराज कार्यकर्ते सर्वच पक्षात असून ते आमच्याकडे आल्यास त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल.