शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता जनताच उठवेल, आमदार वैभव नाईकांची टीका
By सुधीर राणे | Published: May 11, 2023 04:33 PM2023-05-11T16:33:19+5:302023-05-11T16:37:42+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर त्यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला
कणकवली : नितिमत्ता गुंडाळून राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता राज्यातील जनताच उठवेल, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. मुख्यमंत्री शिंदेकडे नितिमत्ता नसल्याने ते राजीनामा देणार नाहीत. पण नितिमत्तेला धरून हे सरकार स्थापन झालेले नाही हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी निकाल दिला. यावर आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर त्यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला. आज सर्वोच्च न्यायालयाने शिंदे- फडणवीस सरकारवर स्थापनेवरून ताशेरे ओढले आहेत. चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे नीतिमत्तेला धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. पण शिंदेकडे नितिमत्ता नसल्याने ते राजीनामा देणार नाहीत.
शिवसेनेसोबत गद्दारी करून राज्य सरकार स्थापन केलेल्या लोकप्रतिनिधींना कधी ना कधी जनतेच्या दरबारात जावेच लागणार आहे. त्यावेळी जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची भूमिका कशी चुकीची होती. केंद्राने त्यांच्यावर कसा दबाव आणला हे निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्याकडे नितिमत्ता राहिलेली नाही हेच स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी कितीही कांगावा केलात तरी जनता त्यांचा बाजार उठविल्याखेरीज राहणार नाही असेही नाईक म्हणाले.