निष्ठेच्या लढाईत जनता माझ्यासोबत राहील : अन्नपूर्णा कोरगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:09 PM2019-12-16T12:09:20+5:302019-12-16T12:14:39+5:30

निवडणुका आल्या की भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलते हे मी मागच्या आणि आताच्याही निवडणुकीत अनुभवले आहे. त्यामुळे आता कितीही नोटिसा दिल्या तरी माघार घेणार नाही. माझी लढाई निष्ठावंतांसाठी आहे आणि या लढाईत मला जनतेची साथ आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगांवकर यांनी दिला आहे.

The people will stay with me in the battle of loyalty: Annapurna Korgaonkar | निष्ठेच्या लढाईत जनता माझ्यासोबत राहील : अन्नपूर्णा कोरगावकर

निष्ठेच्या लढाईत जनता माझ्यासोबत राहील : अन्नपूर्णा कोरगावकर

Next
ठळक मुद्देनिष्ठेच्या लढाईत जनता माझ्यासोबत राहील : अन्नपूर्णा कोरगावकरआता निवडणुकीतून माघारीचा प्रश्नच येत नाही

सावंतवाडी : निवडणुका आल्या की भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलते हे मी मागच्या आणि आताच्याही निवडणुकीत अनुभवले आहे. त्यामुळे आता कितीही नोटिसा दिल्या तरी माघार घेणार नाही. माझी लढाई निष्ठावंतांसाठी आहे आणि या लढाईत मला जनतेची साथ आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगांवकर यांनी दिला आहे.

त्या सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर, प्रसाद कोरगांवकर, युवा पदाधिकारी अखिलेश कोरगांवकर, विराग मडकईकर आदी उपस्थित होते.

कोरगांवकर म्हणाल्या, सावंतवाडीत मागील काही वर्षांत भाजप संघटना वाढीसाठी प्रयत्न केला. पण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मला उमेदवारी नाकारण्यात आली. पण माझ्या मागे त्या प्रभागातील स्थानिक नागरिक होते. त्यामुळे मी त्यांच्या साथीने अपक्ष म्हणून निवडून आले आहे. त्यानंतर मी भाजपला साथ दिली. या माझ्या निष्ठेचे फळ म्हणूनच की काय आताही तेच करण्यात आले. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न असून, यामुळेच मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कोरगांवकर यांनी स्पष्ट केले.

मागील निवडणुकीत मला उमेदवारी नाकारण्यात कोण शकुनीमामा होते ते जनतेने बघितले आहे. आताही तेच असतील, असा संशयही कोरगावकर यांनी व्यक्त केला. मात्र, मी घाबरणार नाही. जनतेच्या दारात जाणार आहे. पक्षाने कितीही नोटिसा दिल्या तरी चालतील पण आता माघार घेणार नाही. अलीकडच्या काळात भाजपमध्ये निष्ठावंंतांना डावलण्यात येते, असा आरोपही कोरगांवकर यांनी केला.

मी पदावर नाही, माझी हकालपट्टी कशी कराल?

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची नोटीस मला मिळाली. पण मी सध्या पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही, मग माझी हकालपट्टी कशी कराल? असा सवाल करीत माझ्या हृदयात नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान कायम आहे.

सामाजिक क्षेत्रातून सर्वांना मदत करेन, असेही कोरगांवकर यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर कोणाला पाठिंबा द्यावा याचा निर्णय जनता घेईल. पण सतत जनतेत जाऊन काम करणार आहे. येथे वेगवेगळे प्रकल्प आणणार असून, महिलांना बचतगटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या हाताला चांगले काम देईन, असेही यावेळी कोरगांवकर यांनी स्पष्ट केले.

नगरपालिकेच्या मागील निवडणुकीतदेखील आपल्याला मतदारांनी अपक्ष म्हणूनच निवडून दिले होते. त्यानंतर आपण भाजपाला सहकार्य करण्याचे ठरविले होते. मला त्या निवडणुकीतदेखील तिकीट मिळू नये म्हणून काही लोकांनी काम केले. मात्र, जनतेला मी हवी होते. त्यामुळे जनतेने त्यांना जागा दाखवून दिली.

अनेकजण मला सहकार्य करणार

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांनी अन्नपूर्णा कोरगावकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच काही काळ त्यांच्याशी चर्चाही केली. माझे आणि कोरगावकर कुटुंबीयांचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे माझे सतत येणे-जाणे असते. त्यामुळे यांचा राजकीय अर्थ काढू नये, असेही श्यामकांत काणेकर यांनी सांगितले. अजूनही अनेकजण मला सहकार्य करणार आहेत, असे अन्नपूर्णा कोरगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. जनता आपल्यासोबत असल्याचा पुनरूच्चार केला.

Web Title: The people will stay with me in the battle of loyalty: Annapurna Korgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.