वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ; सिंधुदुर्ग, रायगडची समाधानकारक खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:38 AM2019-12-03T11:38:05+5:302019-12-03T11:39:48+5:30
४६ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने ३ सुवर्ण पदकांसह वर्चस्व गाजविले. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके आपल्या नावे केली. नवी मुंबईला एका सुवर्ण पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, या दिवशी पालघर व ठाणे ग्रामीण जिल्ह्याची सुवर्ण पदकाची पाठी कोरी राहिली.
सिंधुदुर्गनगरी : ४६ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने ३ सुवर्ण पदकांसह वर्चस्व गाजविले. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके आपल्या नावे केली. नवी मुंबईला एका सुवर्ण पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, या दिवशी पालघर व ठाणे ग्रामीण जिल्ह्याची सुवर्ण पदकाची पाठी कोरी राहिली.
येथील पोलीस क्रीडा मैदान व जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा सुरु असून शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी याचा बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप होणार आहे. चौथ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात सिंधुदुर्ग जिल्ह्याने दोन सुवर्ण, तीन रौप्य, तीन कास्य पदक मिळविली. रत्नागिरी जिल्ह्याने तीन सुवर्ण पदक मिळविली. रायगड जिल्ह्याने दोन सुवर्ण, एक रौप्य मिळविले.
ठाणे ग्रामीणला एकही पदक मिळालेले नाही. नवी मुंबईला एक सुवर्ण, तीन रौप्य, तीन कास्य पदक मिळाली. पालघर जिल्ह्याला एक रौप्य व एक कास्य पदक मिळाले आहे. या सर्व खेळाडूंना शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक जगदीश काकडे, विनीत चौधरी, अविनाश भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक खेळातील पुरुष गटामधील १५०० मीटर धावणे प्रकारात सिंधुदुर्गचा वैभव नार्वेकर प्रथम, नवी मुंबईचे मनीलाल गावीत व योगेश जाधव अनुक्रमे द्वितीय, तृतीय आले. लांब उडी प्रकारात नवी मुंबईचे गुलाब मोरे, सचिन कोळी प्रथम द्वितीय तर सिंधुदुर्गचा अविनाश अनुभवणे तृतीय आला. २०० मीटर धावणे हिट १ प्रकारात सिंधुदुर्गचा राहुल काळे प्रथम, रायगडचा शुभम नांदगांवकर द्वितीय, पालघरचा गणेश वाघचौरे तृतीय आला.
२०० मीटर धावणे हिट २ प्रकारात रायगडचा मनोज हंबीर प्रथम, सिंधुदुर्गचा जयेश कदम द्वितीय तर नवी मुंबईचा विनोद भील तृतीय आला. याच प्रकारातील महिलांच्या १५०० मीटर धावणे प्रकारात रायगडच्या माधुरी लोखंडे प्रथम, सिंधुदुर्गच्या निकिता नाईक व रिना अंधेर अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. थाळी फेकमध्ये रत्नागिरीच्या धनश्री घाडी प्रथम व तेजस्विनी जाधव तृतीय आल्या. द्वितीय पालघरच्या गोदावरी येनकुरे आल्या.
२०० मीटर हिट १ मध्ये रत्नागिरीच्या मंजिरी रेवाळे, द्वितीय नवी मुंबईच्या सीमा यादव तर तृतीय सिंधुदुर्गच्या अस्मिता कारंडे आल्या. २०० मीटर हिट २ स्पर्धेत रत्नागिरीच्या अमृता वडाम प्रथम, सिंधुदुर्गच्या शितल नांदोसकर द्वितीय तर नवी मुंबईच्या इंदिरा भोईर तृतीय आल्या.
सांघिक खेळातील साखळी सामन्यामधील फुटबॉल प्रकारातील पुरुष गटात रत्नागिरी, रायगड, पालघर विजेते ठरले. हॉकीमध्ये रत्नागिरी, नवी मुंबई विजेते ठरले. महिलांच्या गटातील सांघिक खेळ साखळी सामन्यात व्हॉलीबॉलमध्ये ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, रायगड, बास्केट बॉलमध्ये नवी मुंबई विजयी झाली, तर सिंधुदुर्ग व रायगडला चाल मिळाली.
खो-खोमध्ये रायगड, नवी मुंबई जिंकली असून रत्नागिरीला पुढील चाल मिळाली. कबड्डी स्पर्धेत पालघर, रत्नागिरी जिंकली. तर रायगडला पुढील चाल मिळाली. यशस्वी खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी अभिनंदन केले.
विजेत्यांचा गौरव
खो-खोमध्ये सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रायगड विजेते झाले. हँडबॉलमध्ये नवी मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग विजेते ठरले. कबड्डीमध्ये रत्नागिरी, नवी मुंबई विजयी झाली. व्हॉलीबॉलमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे ग्रामीण विजयी झाल्या. बास्केट बॉलमध्ये नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग विजयी झाले. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.