नटबोल्ट गंजल्याने पाणी आत शिरुन नौका समुद्रात बुडू लागली; सुदैवाने रत्नागिरीच्या १५ खलाशांना जीवदान
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 27, 2023 06:15 PM2023-09-27T18:15:47+5:302023-09-27T18:16:38+5:30
देवगड ( सिंधुदुर्ग ) : बोटीचे नटबोल्ट गंजल्याने त्याच ठिकाणाहून पाणी पर्सनेट नौकेच्या आत शिरू लागल्याने रत्नागिरी बंदरातील पर्सनेट ...
देवगड (सिंधुदुर्ग) : बोटीचे नटबोल्ट गंजल्याने त्याच ठिकाणाहून पाणी पर्सनेट नौकेच्या आत शिरू लागल्याने रत्नागिरी बंदरातील पर्सनेट मच्छीमारी नौका कुणकेश्वरनजीकच्या समुद्रात बुडू लागली होती. देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम व त्याचे सहकारी मदतीला धावून बोटीचे इंजिन सुरू करून बोटीसह १५ खलाशांचा जीव वाचविला आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास खोल समुद्रात घडली आहे.
अधिक माहिती अशी की, रत्नागिरीमधील गजानन माउली ही पर्सनेट नौका कुणकेश्वर समुद्रात मच्छीमारी करीत असतानाच बोटीच्या समोरील भागातील नटबोल्ट गंजल्याने त्या ठिकाणाहून पाणी बोटीत शिरू लागले. पाणी शिरल्याने बोटीचे इंजिन बंद पडल्याने बोट बुडू लागली. याचवेळी त्यांनी देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम यांना मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मालकीची बन्सी ही नौका घेऊन तातडीने बुडत असलेल्या गजानन माउली या बोटीकडे धाव घेतली. सुरुवातीला सर्व खलाशी आपल्या नौकेमध्ये घेतले. यानंतर अथक परिश्रमाने बंद पडलेले बोटीचे इंजिन सुरू करून पंपाने पाणी उपसा करीत ही बोट देवगड बंदरात सुखरुप आणली.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे देवगडमधील मच्छिमारांना रत्नागिरीतील समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील खलाशांचे प्राण वाचविले. या त्यांच्या कृत्याबाबत देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी वेळीच समुद्रात जाऊन या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीमध्ये घेतले नसल्यास मोठा अनर्थ झाला असता.