पर्ससीन अन् पारंपरिक मच्छीमार समुद्रात भिडणार?
By Admin | Published: May 9, 2017 11:45 PM2017-05-09T23:45:38+5:302017-05-09T23:45:38+5:30
पर्ससीन अन् पारंपरिक मच्छीमार समुद्रात भिडणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्ससीन नौकाधारक मच्छीमार व पारंपरिक मच्छीमार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बंदी आदेशानंतरही पर्ससीन नेट नौकांकडून समुद्रात मासेमारी सुरू असल्याने पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. समुद्रात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौका मत्स्य व्यवसाय खात्याला दिसत नसल्याने पारंपरिक मच्छीमार अशा पर्ससीन नौकांना समुद्रातच रोखणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आल्याने आता पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन मच्छीमार समुद्रातच एकमेकांना भिडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
१ जानेवारी ते ३१ जुलै या काळात पर्ससीन नेटने सागरी मासेमारी करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. गेल्यावर्षी निर्णय झाल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी गतवर्षी करण्यात आली होती. २०१७ च्या १ जानेवारीपासून पुन्हा पर्ससीन बंदीचा काळ सुरू झाला. परंतु पर्ससीन मासेमारीला बंदी होती, असे कधीच दिसून आले नाही. नेहमीच मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी पर्ससीन मासेमारीला बंदी काळातही अभय दिल्याचा आरोप करण्यात आला. पारंपरिक मच्छीमारांनी बंदी काळातील पर्ससीन मासेमारीचे प्रकार उघडकीस आणून दिल्यानंतरही त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई करण्यात आल्याचा पारंपरिक मच्छीमारांचा आरोप आजही कायम आहे.
याविरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा याआधीच दिला होता. मात्र, पर्ससीनवर कडक कारवाईचे आश्वासन मिळाल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता. जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत पर्ससीन मासेमारी काही बंद झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आता सचिव, मत्स्य व्यवसाय खाते, महाराष्ट्र तसेच आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आंदोलन तीव्र करीत असल्याचे निवेदन सोमवारी दिले आहे.
पर्ससीन मासेमारी अद्याप बंद न झाल्याने पारंपरिक मच्छीमार आता ही लढाई समुद्रात लढणार आहेत. मत्स्य खात्याला पर्ससीन मासेमारी करणाऱ्या समुद्रात न दिसणाऱ्या नौकांना पारंपरिक मच्छीमार समुद्रात रोखणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाला हिंसात्मक वळण लागल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असेही समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारांमधील वाद विकोपाला गेल्याने प्रशासनाने या वादात वेळीच लक्ष घालण्याची व पर्ससीन मासेमारी बंदी काळात बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पारंपरिक व पर्ससीन मच्छीमार समुद्रातच भिडण्याची भीती निर्माण झाली आहे.