पर्ससीन बंदी; २५ कोटींचा फटका

By Admin | Published: March 2, 2016 10:39 PM2016-03-02T22:39:26+5:302016-03-02T23:59:23+5:30

रत्नागिरी जिल्हा : कर्जबाजारी मच्छीमारांवर आत्महत्येची वेळ

Persons detained; 25 Crore Failure | पर्ससीन बंदी; २५ कोटींचा फटका

पर्ससीन बंदी; २५ कोटींचा फटका

googlenewsNext

रहिम दलाल-- रत्नागिरी -जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी बंद झाल्याने या पंधरवड्यामध्ये सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका मच्छीमारांसह त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य व्यावसायिकांनाही बसला आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या मच्छीमारांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येणार आहे. आज पर्ससीन नेटने मासेमारी बंद झाल्याने जिल्ह्यातील महत्वाच्या अशा मिरकरवाडा, साखरीनाटे, जयगड, हर्णै बंदरांमधील आर्थिक उलाढालीवर याचा परिणाम झाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतच पर्ससीन नेटने मासेमारी करण्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढल्याने मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. मासेमारी व्यवसायावर टेम्पो, ट्रक, मासे विक्रेत्या महिला, मासे कापणाऱ्या महिला, बर्फ कारखाने, कामगार यांची कमाईही मच्छीमारांप्रमाणे बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. मिरकरवाडा जेटीवर मासे कापणारी महिला रोजचे कमीत कमी २०० ते ३०० रुपये कमवून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. गेले दहा दिवस पर्ससीन नेट मासेमारी बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मासेमारी बंदरांवर हमालीचे काम करणाऱ्या कामगारांचेही काम बंद झाल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. टेम्पो, ट्रक चालक-मालक यांना माशांची ने-आण करण्याच्या वाहतुकीचे काम मिळत होते. मात्र, बंद मासेमारीमुळे हे वाहतुकीचे कामही ठप्प झाले आहे. अशीच स्थिती राहिली तर शेकडो लोकांनी टेम्पो, ट्रक या वाहनांवर घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार, तसेच त्यांचे कुटुंबियांवरही यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. बर्फ कारखान्यांचीही धडधड सध्या बंद आहे. कारण मासेच नसल्याने बर्फाची उचल होत नाही, त्यामुळे कारखाने बंद अवस्थेत आहेत. पर्ससीन नेट नौकामालकांनी लाखो रुपयांचे कर्ज बँका तसेच पतसंस्थांकडून घेतली आहेत. तसेच खलाशांनाही ९ महिन्यांच्या करारावर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी अचानक अधिसूचना काढून ही मासेमारी बंद करण्याचे आदेश दिल्याने हा संपूर्ण व्यवसायच अडचणीत आला आहे. खलाशांना देण्यात येणारे आठवड्याचे पैसे तसेच खलाशांचे महिन्याचे वेतन, त्यांच्या जेवणाचा खर्च तसेच बँकांचे हप्ते कसे भरणार, त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करणार, अशा अडचणीत नौका मालक सापडले आहेत. त्यामुळे पुढील काही महिने मासेमारी बंद राहिल्यास मच्छीमारांवर कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका जिल्ह्यातील पर्ससीन नेट मच्छीमारांसह इतर व्यावसायिकांना बसला आहे. जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेला मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने पर्ससीन नेटसह इतर व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे.
आधीच मच्छिमारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच पर्ससीन मच्छिमारीवर बंदी आल्याने आता या नव्या संकटाला कसे सामोरे जायचे? असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. याविरोधात हे मच्छिमार आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

व्यवसाय उध्वस्त : उपासमारीची वेळ येणार
पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय हा जिल्ह्याची आर्थिक नाडी आहे. या व्यवसायावर मच्छीमार कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच टेम्पो चालकांपासून ते मच्छी विक्रेत्या, मासे कापणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. या व्यवसायावर शासनाने अचानकपणे डिसेंबरनंतर बंदी घातल्याने हा व्यवसायच उध्वस्त होणार आहे. त्यासाठी पर्ससीन नेटवरील बंदी शासनाने उठवावी. अन्यथा या व्यावसायिकांवर शेतकऱ्यांप्रमाणे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यासाठी शासनाने या सर्व बाबींचा विचार करुन मच्छीमारांना न्याय द्यावा.
- नूरमहंमद सुवर्णदुर्गकर, मच्छीमार नेते, राजिवडा-रत्नागिरी.


तोडगा काढा
पर्ससीन नेटधारक जगला पाहिजे. यासाठी शासनाने काहीतरी तोडगा काढावा आणि या मच्छीमारांनाही रोजीरोटीचे साधन मिळेल, अशी भूमिका घ्यावी, अशी मागणी या मच्छीमारांनी केली आहे.

Web Title: Persons detained; 25 Crore Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.