कणकवलीत पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध, शिवसेनेकडून रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:09 PM2018-05-26T14:09:55+5:302018-05-26T14:09:55+5:30
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कणकवली : पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकानी पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातच ठाण मांडले.
कणकवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून महामार्गावरून चालत जात शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकानी पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातच ठाण मांडले. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांची कोंडी झाली होती.
त्यामुळे पोलिसांनी या रास्ता रोको आंदोलनात हस्तक्षेप करीत सर्व शिवसैनिकाना ताब्यात घेतले.तसेच त्यांना व्हॅनमधून पोलिस स्थानकात नेले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
या आंदोलनात आमदार वैभव नाईक यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख अड़. हर्षद गावडे, राजू राठोड, भुषण परुळेकर , सिध्देश राणे, महेश देसाई,संजय ढेकणे, बाळू मेस्त्री, अरुण परब, नगरसेविका मानसी मुंज,माहि परुळेकर , साक्षी आंबडोस्कर, प्रतीक्षा साटम, अनुप वारंग, नासिर खान, कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, राजन म्हाड़गुत, सुजीत जाधव, संजय पारकर, बाळू पारकर, भालचंद्र दळवी ,योगेश मुंज , तेजस राणे, समीर परब आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
मुंबई -गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प
शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी !
या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'कहा गये..कहा गये..अच्छे दिन कहा गये, कब मिलेंगे.. कब मिलेंगे.. 15 लाख कब मिलेंगे ', अशा घोषणा देत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. आकाशाला भिडलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सलग 13 दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. त्याबद्दल तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
भगवे झेंडे तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक शिवसैनिकानी हातात घेतले होते. पेट्रोल , डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे असे लिहिलेले फलकही शिवसैनिकांच्या हातात दिसत होते. बाळू मेस्त्री तसेच काही शिवसैनिक सायकलवर बसून या आंदोलनात सहभागी झाले होते.
कड़क पोलिस बंदोबस्त !
या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.