तळवडे गाव विकासाच्या टप्प्यात
By admin | Published: December 8, 2014 08:51 PM2014-12-08T20:51:20+5:302014-12-09T00:56:30+5:30
राजकीय बदल फायद्याचे : बाजारपेठेचे विस्तारीकरण होणार नागरिकांना लाभदायक
रामचंद्र कुडाळकर-तळवडे गाव विकासाच्या दृष्टीने गरूडझेप घेत असून, गावातील व्यापारीकरण व बाजारपेठेचे विस्तारीकरण होताना दिसत आहे. तळवडे गाव हा सध्या विकसनशीलतेच्या प्रक्रियेत असून, हा विकास गावातील नागरिकांना लाभदायक ठरत आहे. यामुळे काही समस्यांमध्ये वाढ होत असली तरी ग्रामस्थांमधील एकी या समस्या सोडवण्यासाठी समर्थ असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत विचार करता गावच्या विकासाला मोठी चालना मिळालेली आहे.
तळवडे गावचा विचार करता, या गावास कात उद्योजकांचा गाव म्हणून ओळखले जायचे. पण, सध्या या गावातील कात उद्योजकांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसेंदिवस शासन प्रणालीचे वाढते कडक नियम, कच्च्या मालाचा तुटवडा या कारणांमुळे कात उद्योजकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचप्रमाणे कातमालाच्या दरात दिवसेंदिंवस घसरण होताना दिसते. गतवर्षीचा मालही विक्रीला गेला नसल्याचे समजते. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ‘कात उद्योजकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळवडे गावातील उद्योजकांची बिकट अवस्था झाली आहे.
तळवडे राष्ट्रवादीकडून सेनेकडे
तळवडेतील राजकीय घडामोडींचा विचार करता, गावात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत घडामोडी झाल्या. यात जे गाव पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे, त्याच गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या संपुष्टात आली. आमदार दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक प्रकाश परब यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत केसरकर यांच्याबरोबर सेनेत प्रवेश केला. त्यामुळे तळवडे गावात आता सेनेचे वर्चस्व वाढताना दिसत आहे.
तळवडेच्या ग्रामसचिवालयावर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. पण येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारालाच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या विचारप्रणालीलाही गावात कुठेतरी फूट पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गावातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी झाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद वाढवावी लागणार आहे. तळवडे गावात आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही तयार होत आहे. पण सक्रिय नाहीत. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बदल होण्याची तीव्र शक्यता दिसते.
तळवडे गावातील बाजारपेठेचे विस्तारीकरण होत आहे; पण वाहतूकदारांना, व्यापाऱ्यांना स्वच्छतागृहाचा मात्र तुटवडा भासत आहे. शासनस्तरावरून याचा विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. स्वच्छता मोहिमेच्या दृष्टीने विचार करता, तळवडे बाजारपेठेत स्वच्छतागृहाची सक्त गरज आहे.
शासनाच्या प्रत्येक उपक्रमांत यश
तळवडे गाव हे सावंतवाडी, वेंगुर्ले मार्गाच्या मध्यभागी येत असल्याने या गावच्या बाजारपेठेचा जोमाने विस्तार होताना दिसतो. सावंतवाडी-तुळस-वेंगुर्ले मार्गावर असणाऱ्या तळवडे बाजारपेठेचे विस्तारीकरण होत आहे. या गावचा राजकीय दृष्टीने विचार करता, गावात बऱ्याच राजकीय घडामोडी होत आहेत. त्याचप्रमाणे गाव विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.
शासनाच्या विविध योजना, उपक्रम यात नावलौकिक मिळविला आहे. शासनाच्या प्रत्येक उपक्रमात या गावाने यश संपादन केले आहे. तळवडे गाव हे राज्यातील आदर्शवत गाव ठरले आहे. गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे, एकोप्यामुळे गावात विविध शासनाचे उपक्रम राबविण्यात आले होते. आताही गावात प्रत्येक उपक्रमात एक जूट दर्शविली जाते.