मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंताचा एक फोन अन् संकटात सापडलेल्या तरूणांना मोलाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 06:18 PM2021-03-06T18:18:19+5:302021-03-06T18:20:49+5:30
पुणे येथे सहा युवक गोवा येथे फिरायला गेले होते. गेले तीन ते चार दिवस हे युवक गोव्यात होते. त्याच वेळी या युवकांमधील नयन संतोष घुगले याला गुरूवार पासून पाठीत त्रास होत होता तर पोटदुखीही सुरू झाली होती.
अनंत जाधव
सावंतवाडी : पुणे येथील सहा मुले गोवा येथे फिरायला गेली होती. तेथून परतत असतना एका मुलाचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही बातमी पुणे येथील त्या मृत कुटूंबाच्या नातेवाईकांना समजताच त्यांंनी फोनाफोनी केली त्यातील एक जण पालकमंत्री उदय सामंत यांचे मित्र निघाले, त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मंत्री सामंत यांना माहिती दिली त्यावेळी ते मुंबई येथे होते तेथूनच सामंत यांनी आपल्या दोन स्वीय सहयकांना सावंतवाडीत पाठवून सर्व प्रशासकीय मदत केली तसेच सर्व सोपास्कर करून मृतदेह ही पुण्याकडे रवाना केला.
पुणे येथे सहा युवक गोवा येथे फिरायला गेले होते. गेले तीन ते चार दिवस हे युवक गोव्यात होते. त्याच वेळी या युवकांमधील नयन संतोष घुगले याला गुरूवार पासून पाठीत त्रास होत होता तर पोटदुखीही सुरू झाली होती. पण आपणास गॅसेसचा त्रास असावा म्हणून त्यांनी औषध घेतले. मात्र हा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे पुणे येथे परतण्याचा निर्णय घेतला शुक्रवारी सांयकाळी पुण्याकडे जाणारी आराम बसमध्ये गोव्यात बसले आणि ते निघाले, सिंधुदुर्ग जिल्हयाच्या हद्दीतच पोहचताच नयन यांना अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या छातीत दुखू लागले त्यानंतर झाराप येथे बस थांबवण्यात आली आणि त्यांना लागलीच सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले मात्र रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तेव्हा सोबतच्या तरूणांना मोठा धक्का बसला, या सर्वांना तेथे उपस्थित असलेले काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंंजारी यांंनी धीर दिला त्यानंतर या मुलांंनी मृत नयनच्या नातेवाईकांनाही माहिती दिली. यावेळी नयनच्या मामाने थेट सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संर्पक करत घटनेची माहिती दिली. यावेळी मंत्री सामंत हे मुंबईत होते. त्यांनी आपले स्वीय सहाय्यक शाहू गुजर व सुरज देसाई यांंना घटनेची माहिती देउन सावंतवाडीत जाण्यास सांगितले व सर्व मदत करण्याच्या सूचना केल्या ते लागलीच सावंतवाडी दाखल होत सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण केल्या व मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास रूग्ण वाहिकेने पुण्याकडे रवाना केला तर त्या मुलांंना कारने पुण्याकडे रवाना केले. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं असतं, परंतु पालकमंत्र्यांच्या एका फोनमुळे सगळ्या अडचणीवर मात करता आली.
शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात माडखोल गाठले.
सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात सध्या एकच डॉक्टर शवविच्छेदन करतात, मध्यरात्री त्याठिकाणी कोणी नसल्याने संबंधित डॉक्टरांना बोलवण्यासाठी माडखोल यांच्या घरी जावे लागले, पालकमंत्र्याच्या स्वीय सहय्यकांनी समीर वंंजारी व डॉ.मुरली चव्हाण यांना घेऊन थेट माडखोल गाठले आणि मध्यरात्री शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना घेऊन हॉस्पिटलला आले.