सैनिक स्कूलचे चित्र लवकरच स्पष्ट
By admin | Published: December 10, 2014 12:07 AM2014-12-10T00:07:50+5:302014-12-10T00:16:05+5:30
सुधीर सावंत : माजी सैनिकांच्या अनेक तक्रारी; राजमातांना पाठिंबा जाहीर
सावंतवाडी : आंबोलीतील सैनिक स्कूलबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. मी या तक्रारीची खातरजमा करीत आहे. सरकारी मालमत्तेवर कर्ज घेतल्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे. माहिती मिळाल्यानंतरच सैनिक स्कूलबाबत २० जानेवरीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती माजी खासदार सुधीर सावंत यांनी दिली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
माजी खासदार सुधीर सावंत यांनी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच यापुढे नेहमी संस्थेच्या कामासाठी हाक मारताच मी येत जाईन, असेही माजी खासदार सावंत यांनी राजमातांना सांगितले.
यावेळी शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरस्कर, शिवाजी सावंत, संदीप कुडतरकर, सुरेश परब आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, सावंतवाडीतील शैक्षणिक संस्थेचे कार्य मोठे आहे. हे कार्य आम्ही कदापि विसरू शकणार नाही. त्यामुळेच माझा राजघराण्याला आणि विशेषत: संस्थेला पाठिंबा असून, चुकीच्या माणसाच्या हातात संस्था जाऊ नये, यासाठी सर्वांनीच जागरूक राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्षाच्या विस्तारासाठी देशात फिरतो आहे. त्यामुुळे मी स्थापन केलेल्या संस्थेकडे बघण्यास वेळ नाही. पण, आता यापुढे प्रत्येकवेळी संस्थेच्या कामात लक्ष घालणार आहे. चुकीच्या लोकांकडे संस्था कशी जाणार नाही, हे बघेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सैनिक स्कूलबाबत माजी सैनिक तसेच आंबोलीतील ग्रामस्थांनी तक्रारी नोंदवल्या असून, मी या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरच संस्थेच्या कर्ज प्रकरणाबाबत धर्मादाय आयुक्तांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती लवकरच मला मिळेल, त्यानंतर ३० जानेवारीपर्यंत संस्थेचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सुधीर सावंत यांनी दिलीे. याप्रकरणी सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)