तीर्थस्नानाने यात्रोत्सवाची सांगता
By Admin | Published: February 18, 2015 10:52 PM2015-02-18T22:52:33+5:302015-02-18T23:44:52+5:30
लाखोंची उपस्थिती : कुणकेश्वर गजबजले, चोख व्यवस्थेमुळे यात्रा सुरळीत
प्रसाद बागवे- कुणकेश्वर -महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या श्री कुणकेश्वराच्या यात्रेची देवस्वाऱ्या व भाविकांच्या पवित्र तीर्थस्नानाने सांगता झाली. दुसऱ्या दिवशीही भाविकांनी यात्रास्थळी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावली. तासनतास रांगेत उभे राहून भाविकांनी श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावर्षी अमावास्या योग पूर्ण दिवस असल्याने भाविकांनी तीर्थस्नानाचा लाभ घेतला. आबालवृद्धांनी देवस्वाऱ्यांसोबत पवित्र स्रानाचा योग साधला. अपेक्षेप्रमाणे गर्दीचा उच्चांक झाल्याने व्यापारी वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात होते. बुधवारी एसटी बसेसपेक्षा खासगी वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढली होती. वाढत्या गर्दीमुळे काही वेळा श्रींच्या मुखदर्शनाचा निर्णय देवस्थान समितीला घ्यावा लागला. प्रशासनाच्या सर्व विभागांमार्फत योग्य ती सेवा पुरविली जात होती. यावर्षी विशेष म्हणजे बीएसएनएलची सेवा सुरळीत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. विद्युत व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये योग्यप्रकारे बजावली. समुद्रकिनारी भाविकांच्या पवित्र स्रानावेळी कोणतीही वाईट घटना घडू नये म्हणून प्रशासन, तटरक्षक दल व देवस्थान कमिटीमार्फत खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात येत होते. समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांची मोठी उलाढाल झाली. स्थानिक भजन मेळ्यासोबत मुंबईस्थित प्रसिद्ध भजन मंडळांनी कुणकेश्वरचरणी आपली सेवा अर्पण केली. मुंबई ते कुणकेश्वर रथयात्रा आयोजित करण्यात आली होती. रांगेतील भाविकांना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व मोफत सरबत वाटपाची सोय करण्यात आली होती. लहान मुलांचे विविध खेळ, आकाश पाळणे, झुले आदींकडे बच्चे कंपनीचा विशेष ओढा होता.यात्रेदरम्यान खाद्यपदार्थांच्या दुकानात विशेष विक्री झाली. लहान मुलांची खेळणी, तयार कपड्यांची दुकाने, विविध शेती व गृहोपयोगी साहित्य आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत होती. श्री चरणी अर्पण करण्यासाठी बेल, श्रीफळ आदींची विक्री मोठ्या प्रमाणावर होत होती. श्रींच्या प्रसादाचे स्वरूप यावर्षी ड्रायफ्रुट्स, बुंदी अशा स्वरूपात होते. मंदिराच्या आतील भागात फुलांचे आकर्षक सुशोभिकरण करण्यात आले होते. नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. प्रशासनाने देवस्थान ट्रस्टसमवेत चोख व्यवस्था केल्यामुळे यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यास मदत झाली.
सहा देवस्वाऱ्यांकडून समुद्रस्नान
बुधवारी श्री देव रवळनाथ (वायंगणी), श्री देव लिंगेश्वर-पावणाई (साकेडी), स्वयंभू महादेव पावणाई (वळीवंडे), रामेश्वर-सातेरी (त्रिंबक), श्री महादेवगिरी (माईण), श्री देवी भगवती गांगेश्वर (आंब्रड) या देवस्वाऱ्यांनी समुद्रस्रान केले.