सिंधुदुर्ग : पिंगुळीत ग्रामस्थांचे आंदोलन, पिंगुळी-आसनाचे पाणी येथील पालकांचे शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:21 PM2018-01-24T18:21:19+5:302018-01-24T18:26:33+5:30
शिक्षिका वेळेवर येत नसल्याने पिंगुळी-आसनाचे पाणी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळे ठोकत शाळा बंद आंदोलन केले. जोपर्यंत उशिरा येणाऱ्या शिक्षिकेच्या जागी दुसरी शिक्षिका दिली जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. पिंगुळी-आसनाचे पाणी येथे पहिली ते चौथीकरिता जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा असून या शाळेत सध्या दोन शिक्षिका कार्यरत आहेत.
कुडाळ : शिक्षिका वेळेवर येत नसल्याने पिंगुळी-आसनाचे पाणी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळे ठोकत शाळा बंद आंदोलन केले. जोपर्यंत उशिरा येणाऱ्या शिक्षिकेच्या जागी दुसरी शिक्षिका दिली जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला.
पिंगुळी-आसनाचे पाणी येथे पहिली ते चौथीकरिता जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा असून या शाळेत सध्या दोन शिक्षिका कार्यरत आहेत. सुमारे १० ते १२ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. शाळेतील शिक्षिका मृदुला सावंत उशिराने येतात. याकडे शासनाचेही दुर्लक्ष होत आहे. संबंधित शिक्षिकेची बदली करून याठिकाणी अन्य शिक्षक किंवा शिक्षिकेची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली.
आंदोलनावेळी पालकांनी शाळेतील वर्गखोल्यांना कुलूप ठोकले व मुलांना व्हरांड्यात बसविले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारालाही कुलूप ठोकले होते. राजश्री काळप, प्रकाश माडये, महेंद्र पिंगुळकर, कौस्तुभ गवस, नागेश परब, सुनील सडवेलकर, किशोर गवळी, संतोष तुळसकर, उमेश तुळसकर, विद्या भगत, अमित सर्वेकर, गणपत गवळी, सुनीत सडवेलकर, रवींद्र गवळी, सीताकांत पिंगुळकर आदी पालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, आंदोलकर्त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकल्याने शिक्षिकेला बाहेरच थांबावे लागले.
तोपर्यंत शाळा बंद!
शाळेतील संबंधित शिक्षिका गेली दोन वर्षे उशिराने येत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्या शिक्षिकेची बदली होत नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरा शिक्षक येत नाही, तोपर्यंत शाळा बंद आंदोलन छेडणार असल्याचे पालकांनी सांगितले. अधिकाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचे पालकांनी सांगितले.