पिण्याच्या पाण्यासाठी करताहेत पायपीट, ऐन पावसाळ्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 12:09 PM2020-08-31T12:09:19+5:302020-08-31T12:10:20+5:30
ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, नळपाणी योजना स्वत: चालविणारे ग्रामपंचायत सदस्य अजय परब निर्धास्त आहेत. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दोडामार्ग : कुडासे गावातील चार वाड्यांवरील सुमारे दीडशे कुटुंबांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना गेल्या पंधरा दिवसांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, नळपाणी योजना स्वत: चालविणारे ग्रामपंचायत सदस्य अजय परब निर्धास्त आहेत. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
येथील देसाईवाडी, वानोशीवाडी, धनगरवाडी, खैरातवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना चतुर्थीपूर्वीच नादुरुस्त झाली आहे. सुमारे दीडशे कुटुंबे या पाणी योजनेवर अवलंबून आहेत. मात्र, गेले पंधरा दिवस येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ही नळपाणी योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसून ती पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीकडे आहे.
मात्र, ग्रामपंचायत सदस्य अजय परब हे वैयक्तिकरित्या ही नळपाणी योजना चालवितात. पाणीपट्टी वसुलीपासून ते देखभाल दुरुस्तीपर्यंत ते स्वत: करीत आहेत. मात्र, त्याचा हिशोब अद्यापपर्यंत ग्रामपंचायत वा पाणीपुरवठा समितीला त्यांनी दिलेला नाही.
कुडासे गावातील नळपाणी योजना गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून उत्सवाच्या कालावधीतच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर आहे.
ऐन पावसाळ्यात एकीकडे पूर येतोय तर दुसरीकडे पिण्याचे पाणी मिळत नाही. याला काय म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चतुर्थीपूर्वी नादुरुस्त झालेली नळपाणी योजना दुरुस्त करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे अत्यावश्यक होते. परंतु याकडे परब यांनी दुर्लक्ष केले.
परिणामी ग्रामस्थांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. ही बाब खेदजनक असल्याची खंत ग्रामस्थ संतोष देसाई, उल्हास देसाई, बाजीराव देसाई यांसह अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.