रेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:44 PM2020-09-21T13:44:11+5:302020-09-21T13:46:25+5:30
कणकवली तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे.
कणकवली : तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे. वृद्ध ग्रामस्थांनाही सावडाव गावात रेशन धान्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर समस्येकडे कणकवली तहसीलदार रमेश पवार लक्ष देतील का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे. सावडाव गावठणवाडी येथे रेशन धान्य दुकान संपूर्ण गावाचे आहे. त्याठिकाणी इंटरनेट सेवा मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पॉस मशीनवर रेशन कार्डधारकाचे अंगठे घेता येत नाहीत.
त्यासाठी रेशन धान्य दुकानदार बाळा वारंग यांनी गावातील जंगलमय अशा सावडाव धबधब्यानजीकच्या परिसरात प्लास्टिकचे कागद बांधून झोपडी उभारली आहे. त्याठिकाणी रेशन दुकानदार बसतात. कार्डधारकांना त्याठिकाणी जावे लागते. तिथे पॉस मशीनवर अंगठा लागला तरच धान्य दिले जात आहे.
एकीकडे कोरोना महामारीत जनता होरपळली जात असताना रेशनिंगसाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने जंगलात जाऊन अंगठा लावावा लागत आहे. या समस्येने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
तसेच यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या समस्येमुळे वृद्ध तसेच गोरगरीब ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जंगलात जाऊन तेथे थांबावे लागत आहे. तसेच येणे-जाणे यात वेळ खर्ची जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांना रेशनिंग दुकानावरील धान्य घेण्यासाठी २ किलोमीटर पायपीट किंवा विनाकारण वाहन खर्च करावा लागत आहे. एकीकडे कोरोना महामारीत नागरिक त्रस्त झाले असताना पॉस मशीन डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार रमेश पवार किंवा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. तसेच त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सावडाव ग्रामस्थांनी केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता मेटाकुटीस आली आहे.