पर्यटकांना खुणावतोय असनियेतील कुणेवाडी धबधबा
By admin | Published: July 25, 2016 10:20 PM2016-07-25T22:20:25+5:302016-07-25T23:11:49+5:30
सुरक्षित पर्यटन स्थळ : ग्रामपंचायतकडून रस्त्याचे काम पूर्ण; आंबोली, मांगेलीला पर्याय; बांद्यातून १८ कि.मी. अंतर
महेश चव्हाण -- ओटवणे --सह्याद्री डोंगरपट्ट्याच्या कुशीत वसलेल्या असनिये गावातील कुणेवाडी धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. असनिये हायस्कूलपासून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या धबधब्यावर जाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने रस्ताही केल्याने आंबोली-मांगेली धबधब्यांबरोबरच आता असनिये-कणेवाडी धबधबाही पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
सावंतवाडी तालुक्यापासून
२१ कि.मी., तर बांदा बाजारपेठेपासून केवळ १८ कि.मी. अंतरावर असनिये गाव आहे. सावंतवाडीतून येताना माजगाव (नाला)-ओटवणे-भालावल-तांबोळी-असनिये असा प्रवास, तर बांदा मार्गे विलवडे-भालावल-तांबोळी-असनिये, असा प्रवास करून यावे लागते.
उंचउंच नारळ-पोफळीच्या बागांनी जवळजवळ सह्याद्रीच्या डोंगरांना गवसणी घातलेल्या या निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने नटलेल्या असनिये भागात ‘कणेवाडी धबधब्याने’ आणखीनच सौंदर्य वाढले आहे. हरितक्र ांतीचे माहेरच असलेल्या या गावात कणेवाडी आणि गावठणवाडी, असे दोन फेसाळत वाहणारे शुभ्र धबधबे कार्यान्वित आहेत. त्यातील गावठणवाडी धबधबा अडगळीत आणि तेथे पोहोचणे कठीण असल्याने तेथे पर्यटक पोहोचू शकत नाही. मात्र, कणेवाडी धबधबा रस्त्याच्या नजीकच आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी मार्ग केल्याने हा धबधबा पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी खुला आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत असून, असनिये-कणेवाडी धबधबा आंबोली, मांगेली धबधब्यांना पर्याय ठरत आहे. आंबोली, मांगेली धबधब्यावरील पर्यटकांचा उच्चांक बघता कुटुंबवत्सल पर्यटकांना हे जवळचे आणि सुरक्षित असे पर्यटनस्थळ आहे.
या गावात या धबधब्यासह वनौषधींचाही मोठा साठा आहे. तसेच येथील विविध पक्षी-प्राणी हे सुद्धा अभ्यासकांना नवीन शोधाची संधी उपलब्ध करून देणारे आहेत. डोंगरातून पाण्याचे वाहणारे बारमाही झरे, स्वयंभू वाघदेव मंदिर, जुनाट देवराई, वैशिष्ट्यपूर्ण झाडे, डोंगरपट्ट्यात शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या बागायती, लोळण गावातून दिसणारे खलाटीकडचे निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण निसर्गप्रेमींना एक सुखद अनुभव देऊन जाते. निसर्गाच्या सान्निध्यात दोन डोंगरांमधून कोसळणारा हा धबधबा व त्याच्या टेकडीवर असलेला हनुमंत गड सर्वांनाच मोहिनी घालत आहे. त्यामुळे ‘असनिये कणेवाडी’ धबधबा आकर्षण ठरत असून, पर्यटकांची दिवसेंदिंवस संख्या वाढत असल्याने पर्यटनाला चालना मिळाली आहे.
कणेवाडी धबधब्याच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, धबधब्यापर्यंतचा मार्ग खुला करण्यात आला आहे. धबधब्यावर पर्यटनदृष्ट्या अद्ययावत सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शासनाने याक डे टाळाटाळ न करता विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यटनप्रेमी व ग्रामस्थांतून होत आहे.
- गजानन सावंत
सरपंच, ग्रामपंचायत असनिये
शासनस्तरावरून प्रयत्न
काही वर्षांपूर्वी कणेवाडी धबधबा लांबूनच पर्यटकांच्या निदर्शनास येत होता; पण स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता खुला केला आणि पर्यटक आनंद लुटू लागले. पण, अजूनही या पर्यटनस्थळाचा हवा तसा विकास झालेला नाही.
धबधब्यावर जाण्यासाठी पायऱ्या, खालच्या बाजूला लोखंडी सुरक्षात्मक कठडे, मोकळी जागा, शेड, आदी अद्ययावत सोयी निर्माण झाल्यास हा धबधबा अधिकच प्रकाशझोतात येईल. त्यासाठी जिल्हास्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
रोजगाराची संधी : असनिये-कणेवाडी धबधबा सध्या आकर्षणाचा विषय ठरत असून, धबधब्याजवळ पर्यटकांच्यादृष्टीने विविध सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.