पर्यटनस्थळांचा विकास नियोजनबद्ध
By admin | Published: April 15, 2015 09:41 PM2015-04-15T21:41:07+5:302015-04-15T23:56:40+5:30
दीपक केसरकर : पर्यटकांना मिळणार मूलभूत अन् अत्याधुनिक सुविधा, आराखडा तयार करणार
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सागरी किनारे व धबधबे या पर्यटनस्थळांचा परिपूर्ण विकास होणे गरजेचे आहे. पर्यटनस्थळांना मूलभूत सुविधा ते अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी शासनाच्या सर्व अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी आपला अंमलबजावणी आराखडा तयार करून तत्काळ कामे सुरू करण्याचे आदेश ग्रामविकास, वित्त राज्यमंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवनमध्ये पर्यटनविषयक आयोजित बैठकीत दीपक केसरकर बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यकारी अभियंता राहुल वसईकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवलीच्या छाया नाईक यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनविकास करताना प्रत्येक पर्यटनस्थळांना अभ्यास करून तेथील बलस्थान लक्षात घेऊन त्याप्रमाणे विकास करण्यात आला पाहिजे. आपत्कालीन स्थिती, मूलभूत सुविधा, अत्याधुनिक सुविधा पर्यटकाला पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. अंमलबजावणी यंत्रणांनी या गोष्टींचा अभ्यास करून परस्पर समन्वयातून कामे पूर्ण केली पाहिजेत. प्रत्येक तालुकानिहाय जिल्हा नियोजनमधून करण्यात येणारी पर्यटनस्थळांची कामे पावसाळ््यापूर्वी पूर्ण करा. ज्या सागरी किनारी सुरूची बने लावता येतील, अशी ठिकाणे शोधून तशा पद्धतीने लागवड करा. घनकचरा व्यवस्थापन ते शौचालय, स्थानिक तात्पुरत्या स्वरूपाचे टेन्ट, टेन्टमध्ये दर्जेदार सोयी सुविधा पुरवाव्यात, जेवण, इंटरनेटसारख्या सुविधाही दर्जेदार असल्या पाहिजेत. बांधकामासाठी जागेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित महसूल यंत्रणेशी संपर्क साधावा, अशाप्रकारे सागरी किनारे विकसित करताना पर्यटन स्थळांपर्यंत जाणारा रस्ता हा दर्जेदार असावा, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आपत्कालीन यंत्रणांबाबत शासकीय यंत्रणा गांभीर्याने घेत नाहीत. वास्तविक पाहता पावसाळ््यात आपत्कालीन प्रशिक्षित कर्मचारी वर्ग शासनाकडे असणे आवश्यक आहे. आपत्कालीन प्रशिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने पावसाळी पर्यटनासाठी ही बाब अत्यंत आवश्यक असून, शासनाने स्वयंसेवी यंत्रणेच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीपूर्वी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे ट्रेकिंग, जंगल सफारी करताना अशा यंत्रणेची गरज भासू शकते. शासनाच्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने पर्यटनामधून दिलेली कामे पावसाण्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. (प्रतिनिधी)
पाच धबधबे विकसित करणार
जिल्ह्यातील पाच धबधबे प्रथम विकसित करण्यात येणार आहेत. त्यांची निवड करून संबंधित पर्यटनस्थळाच्या ठिकाणी शौचालय, तसेच त्या त्या ठिकाणी आवश्यकता लक्षात घेऊन अंमलबजावणी आराखडा बनवावा. पावसाळी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव असून, संबंधित विभागातील कार्यकारी अभियंता यांनी पर्यटनस्थळांची पाहणी करून प्रत्यक्ष कामांना सुरूवात करावी. येत्या पावसाळ््यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे आदेश दीपक केसरकर यांनी संबंधित अंमलबजावणी यंत्रणांना दिले.
तसेच खाड्यांच्या ठिकाणी पर्यटनाला असणारा वाव लक्षात घेता त्या ठिकाणीही सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामाला पतन विभागाने मेरीटाईम बोर्डाच्या सहायाने खाड्यांच्या ठिकाणी पर्यटन विकास करण्यासाठी प्राधान्य द्यावे. मालवण चिवला बीच येथे सोयीसुविधा पुरविताना कामाच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करू नये. स्थानिकांना पर्यटनामधून रोजगार उपलब्ध होईल व कामे दर्जेदार होतील, असे पाहावे, असे निर्देशही दीपक केसरकर यांनी दिले.