कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे वेंगुर्ला येथे वनस्पती संवर्धन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:09 PM2020-06-19T16:09:44+5:302020-06-19T16:12:32+5:30
कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मिती प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू करण्यात आला.
वेंगुर्ला : कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मिती
प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू करण्यात आला.
या प्रकल्पाद्वारे कोकणातील शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचविण्याच्या दृष्टीने हा प्रामाणिक प्रयत्न असल्याची माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत व लुपिन फाऊंडेशनचे अधिकारी योगेश प्रभू यांनी दिली.
कोकण म्हटले की आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी, कोकम आदी फळे आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र, येथील उष्ण व दमट हवामान कोकणातील जैवविविधता टिकवण्याचा दृष्टीने अत्यंत पोषक आहे. यामध्ये मसालावर्गीय, औषधी, सुगंधी व इतर दुर्मीळ वनस्पतींचा समावेश होतो. म्हणूनच आजच्या बदलत्या वातावरणात कोकणात आढळणाºया या जैवविविधतेचा अभ्यास करणे महत्त्वाचे व आव्हानात्मक कार्य आहे.
या अनुषंगाने सुरंगी, वटसोल, वावडिंग, त्रिफळ, कडीकोकम यासारख्या कोकणामध्ये नैसर्गिक अधिवासात आजही तग धरून असणाऱ्या व व्यापारीदृष्ट्या महत्त्व असूनही दुर्लक्षित राहिलेल्या वनस्पतींचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. या पिकांखाली असलेले क्षेत्र वाढविण्यासाठी, कोकणातील शेतकऱ्यांना या दुर्लक्षित औषधी, मसाला व सुगंधी पिकांकडे वळविण्यासाठी काळाची गरज आहे.
या अनुषंगाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्यात २३ आॅगस्ट २०१८ रोजी सामंजस्य करार झाला. कोकणातील दुर्लक्षित पिकांचे सर्वेक्षण, संग्रह, जतन व विविध अभिवृद्धी पद्धती विकसित करणे व या पिकांची दर्जेदार रोपे निर्मिती करणे या प्रमुख उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे पिकांची लागवड, उत्पादन, रोपवाटिका प्रक्रिया व विक्रीद्वारे कोकणातील सुशिक्षित बेरोजगारांना, युवकांना व महिला वर्गाला नवीन संधी उपलब्ध होणार आहे.