बचत गटांमार्फत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रम

By admin | Published: November 30, 2015 09:44 PM2015-11-30T21:44:50+5:302015-12-01T00:19:30+5:30

दापोली तालुका : आसूदबाग येथील त्रिवेणी संगम, सातारकरीण माता, माता रमाई बचत गटांचा पुढकार

'Plant trees, trees live' by saving groups | बचत गटांमार्फत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रम

बचत गटांमार्फत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रम

Next

दापोली : जंगलांचा नायनाट करून माणसाने निसर्गाचे चक्र पार बदलून टाकले आहे. जंगलांची बेसुमार तोड झाल्याने पावसानेदेखील पाठ फिरवली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दापोली तालु्क्यातील आसूदबाग येथील त्रिवेणी संगम बचत गट व सातारकरीण माता बचत गटांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम हाती घेतला असून, तो पूर्ण करण्यासाठी बचत गटातील सदस्य मेहनत घेत आहेत. या दोन बचत गटांना माता रमाई बचतगट देखील यामध्ये साथ देत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत दापोली पंचायत समिती कडून या दोन बचत गटांना प्रत्येकी २०० अशी एकूण ४०० झाडे सप्टेंबर २०१५रोजी देण्यात आली. ही झाडे आसूद गावातील रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली आहेत. या बचत गटांतील महिला एकत्र येऊन चार -चार दिवसांनी या झाडांना पाणी घालत आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी या महिलांनी आपल्याकडील जुन्या साड्यांचा वापर करुन झाडांभोवती साड्यांचे आच्छादन लावून ती बंदिस्त केली आहेत. यामुळे झाडांचे जनावरांपासून संरक्षण होणार आहे. बचत गटांनी लावलेल्या झाडांची आता योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे.
त्रिवेणी संगम बचत गटाच्या सचिव विनया बांद्रे म्हणाल्या की, अशा प्रकारचे आम्ही अनेक उपक्रम राबवित असतो. आताही आम्ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहेत. ती जगवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्रिवेणीसंगम बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी बाईत, सचिव विनया बांद्रे तर सातारकरीण माता बचत गटाच्या अध्यक्षा ज्योत्स्रा बांद्रे, सचिव दीपिका मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटातील सदस्या काम करत आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश सर्वत्र पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विनया बांद्रे यांनी सांगितले.
परंतु, या गटाने लावलेली बदाम, गुलमोहर यासारखी झाडे चोरीला जाण्याचा प्रकारदेखील घडला आहे. तसेच असाच उपक्रम गावातील अन्य बचत गटांनीदेखील चालविला असून, त्या झाडांची देखभालही हे बचतगट करत आहेत. या बचत गटांच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Plant trees, trees live' by saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.