परप्रांतियांकडून लागवड...स्थानिकांची परवड

By admin | Published: March 16, 2016 10:37 PM2016-03-16T22:37:08+5:302016-03-16T23:54:39+5:30

दोडामार्गमधील शेतीतील विदारक अवस्था : केळी, रबर, अननस फळबागांत परप्रांतियांची घुसखोरी--दोडामार्गच्या विकासाची दिशा

Planting from parasites ... | परप्रांतियांकडून लागवड...स्थानिकांची परवड

परप्रांतियांकडून लागवड...स्थानिकांची परवड

Next

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवा तालुका म्हणून दोडामार्ग तालुक्याची ओळख आहे. भौगोलिक परिस्थिती जरी खडतर असली तरी येथे पर्यटन उद्योगधंदे शिवाय कृषीक्षेत्राच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करणे शक्य आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या सतरा वर्षांच्या इतिहासात म्हणावे तसे प्रयत्न तालुक्याची विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी झाले नाहीत. इथला विकास कोणत्या माध्यमातून होऊ शकतो, त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत, यावर विचारमंथन करणारी आणि तालुक्याची विकास प्रक्रिया गतिमान करणारी ‘विकासाची दिशा’ ही मालिका ‘लोकमत’ आजपासून सुरू करीत आहे...
वैभव साळकर --दोडामार्ग
तालुक्यातील शेतजमिनीत केळी, रबर या लागवडीपाठोपाठ आता अननस पिकाचेही पिक घेतले जात आहे. योग्य नियोजन व मेहनत घेतल्याने दोडामार्गमध्ये परप्रांतीय शेतकऱ्यांनी प्रचंड नफा मिळविल्याचे दाखवून दिले आहे. आपल्या जमिनी परप्रांतियांना कवडीमोलाने विकून स्थानिक शेतकऱ्यांची मात्र मोठी परवड होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी ही शेतजमीन विकण्यापेक्षा कष्टाने फुलविली तर दोडामार्गचा विकास होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यातून आर्थिक सुबत्ताही येईल.
तालुक्यात येथील बळीराजा पारंपरिक भातशेती आणि नारळ, सुपारी व काजू या बागायतीची शेती करत होता. यातून तो म्हणावा तसा ‘समृद्ध’ झाला नाही. परिणामी शेती पडीक राहू लागली. त्यामुळे दोडामार्गच्या शेतजमिनीत परप्रांतीयांची घुसखोरी सुरू झाली.
केरळ राज्यातून महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यात मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात केरळीयन शेतकऱ्यांची ‘एंट्री’ झाली आहे. कृषीक्षेत्रात अग्रेसर असणारे केरळ राज्य आणि तेथील ‘अभ्यासू’ शेतकऱ्यांना दोडामार्गमधील ‘सुपीक’ जमिनीने वेड लावल्याने वर्षानुवर्षे दोडामार्ग तालुक्यात केरळीयनांच्या संख्येत वाढच होत आहे. पाच-दहा वर्षांपूर्वी केवळ हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांची आजची एकट्या दोडामार्ग तालुक्यातील संख्या ‘गणती’ पलीकडची आहे. यामुळे दोडामार्ग तालुक्यात रबर लागवड विक्रमी क्षेत्रात झाली असून ओसाड डोंगर रांगात परप्रांतीयांनी रबराचे नंदनवन फुलविले आहे.
दोडामार्गमधील काही शेतकरी आता परप्रांतियांच्या पावलावर पाऊल ठेवून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी येथील बहुतांश गावांना उपलब्ध झाले आहे. श्रम केल्यास नफा मिळतो, हे परप्रांतियांनी दाखवून दिल्याने स्थानिक बेरोजगार तरुण शेतकरी आता शेतीकडे वळले आहेत. तिलारी खोऱ्यातील युवकांनी तर घोटगे, घोटगेवाडी, भटवाडी आदी गावांमध्ये ‘समूहशेती’चा नवा पायंडा घातला आहे. तेथील सुशिक्षित तरुणांनी आठ-दहा युवकांचे गट करुन संयुक्तिकरित्या कित्येक एकर क्षेत्रात केळी लागवड केली आहे.
पूर्वीच्या शेतकऱ्यांच्या नकारात्मक समजुतीला परप्रांतातील शेतकऱ्यांनी पूर्णत: तिलांजली दिली आहे. मुळस येथे अननस लागवड करणाऱ्या जॉर्ज नामक केरळीयन शेतकऱ्याने तर येथील स्थानिक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श पायंडा घातला आहे. सुरूवातीला केवळ ‘केळी’, मग रबर आणि आता ‘अननस’ अशी कृषी-बागायतीची नवनवीन ‘कवाडे’ यशस्वीरित्या परप्रांतीय शेतकऱ्यांनी दाखवली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणे आवश्यक आहे.
परप्रांतीय जर लाखो रुपये मोजून जमिनी घेऊन आपल्या घरापासून हजारो मैलावर येऊन कृषीक्रांती घडवितात, तर भूमिपुत्राला आपल्याच घरालगत ‘कृषीक्रांती’ साधण्यास अवघड ते काय, याचाही येथील प्रत्येक नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे.

‘कृषीक्रांती’ची नवी कवाडे
परप्रांतीय शेतकऱ्यांनी आता दुर्गम अशा दोडामार्ग तालुक्यात ‘कृषीक्रांतीची’ नवी कवाडे उघड केली आहेत. सुरूवातीला केवळ केळी लागवडीतून त्यांनी समृद्धी साधली होती.
आता लाखो रुपयांची गुंतवणूक करुन ‘रबर व अननस’ अशा लागवडीकडे ते वळले आहेत.
सुरुवातीला केळी लागवडीतून आर्थिक सुबत्ता मिळविणारे परप्रांतीय आता सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत.

Web Title: Planting from parasites ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.