मडुरा स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ चा भराव खचला
By Admin | Published: August 12, 2015 11:19 PM2015-08-12T23:19:00+5:302015-08-12T23:19:00+5:30
अपघाताला निमंत्रण : सिंधुदुर्गातील शेवटचे स्थानक, तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे
बांदा : कोकण रेल्वेचे सिंधुदुर्गातील शेवटचे स्थानक असलेल्या मडुरा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ चा मातीचा भराव खचला आहे. त्यामुळे येथे मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या प्लॅटफॉर्मची तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
मडुरा स्थानक परिसरात प्लॅटफॉर्म बांधताना घालण्यात आलेला मातीचा भराव एका बाजूने कोसळत चालल्याने यामुळे प्लॅटफॉर्मला धोका निर्माण झाला आहे. मडुरा येथील रेल्वेस्थानक ओेहोळानजीकच मातीचा भराव टाकून जवळच रेल्वेचे रुळ टाकण्यात आले आहेत. पावसाळयात ओहोळातील वाहत्या पाण्यामुळे माती भुसभुशीत झाल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून गेली आहे. त्यामुळे एक बाजू पूर्णपणे खचली आहे. गेले काही दिवस या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रेल्वे रुळ खचण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्लॅटफॉर्म नंबर १ चा भराव खचून सुमारे २५ मीटरचा मोठा खड्डा पडल्याने या मार्गाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांना गाडीतून उतरताना त्रास होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मडुरा रेल्वेस्थानकाच्या सुसज्जीकरण व डागडुजीकडे त्वरीत लक्ष देऊन हा मार्ग सुरक्षित करावा अशी मागणी मडुरावासियांकडून होत आहे. मागील आठवड्यात मध्यप्रदेशात रेल्वेमार्गाखालील मातीचा भराव वाहून गेल्याने दोन एक्सप्रेस गाड्यांना भीषण अपघात होऊन अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या प्लॅटफॉर्मची लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत मडुरा स्टेशनमास्तर प्रतीक्षा गावकर यांना विचारले असता आपण येथील समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्या असून येथील समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती व्हावी
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. त्यासाठी गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच मार्गावर रेल्वेगाड्यांचा ताण तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेमार्गाची तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची तपासणी करुन रेल्वे रुळानजीक खचलेल्या भागाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.