नाही पुस्तक नाही शाळा हवे तेवढे खुशाल खेळा
By admin | Published: December 9, 2014 08:23 PM2014-12-09T20:23:30+5:302014-12-09T23:22:24+5:30
गावपळणीनिमित्त गावाबाहेर संसार : आचरेवासिय लुटताहेत सहजीवनाचा अनोखा आनंद
कपिल गुरव -आचरा -‘घरचा पुढचा दार झाडूचा आसा मागच्या दारात खूप पतेरो साठलो आसा, बाळ्याक शाळेत पोचूक उशीर होता, बायोचो डबो आजून करूक सवड नाय गावना, सकाळचे १० वाजत इले तरी अजून खयचाच काम झाला नाय हा’ ना असे बोलणे होत ना कसली कामाची कटकट ना कसली धावपळ. सगळा कसा अगदी आराम आणि आराम! आचरावासिय सीमेपलिकडे रहात असलेल्या झोपड्यांना, राहुट्यांना भेट दिल्यावर घरातल्या कर्त्या घरधणीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होते. संपूर्ण आचरेवासिय अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक स्वरूपात राहताना दर तीन वर्षांनी मिळणारा सहजीवनाचा अनोखा आनंद लुटत आहे.
रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आचरा गाव हळूहळू खाली झाल्यानंतर आचरेवासियांनी पारवाडीच्या सीमेपलिकडे, चिंदर सडेवाडीच्या माळरानावर तर काहींनी भगवंतगड रोडवर तर काहींनी आडबंदराच्या डोंगरावर आपल्या नव्या घरात गावपळणीनिमित्त आपले संसार थाटले आहेत. शालेय विद्यार्थी ना शाळेचे ना क्लासचे टेन्शन असल्याने मुक्तपणे या गावपळणीमध्ये आनंदाने सामील झाले आहेत. खेळणे, बागडणे या कार्यक्रमापुढे त्यांना अन्य कसलाच विचार सुचत नाही. दररोजच्या व्यापातून कंटाळलेले आचरावासिय गावपळणीनिमित्त मिळालेल्या या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. घराघरामधील बायका एकत्रितपणे गप्पांचे फड रंगवित आहेत. युवकवर्गाच्या मासेमारीला उत आला असून रविवारची रात्र अनेकांनी आपल्या तिखट जेवणाने रंगविली आहे.
अनेक वाड्यांमधील दररोजची असणारी भांडणे विसरून शेजारी पाजारी या निमित्ताने एकत्र आले असून ते आपल्या विचारांची देवाणघेवाण करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे सापशिडी, कबड्डी, लगोरी, आबाधुबीचे खेळ बहरात आले असून घराघरातून एकमेकांनी केलेल्या खाद्यपदार्थांची देवाणघेवाण चालू असून निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात निसर्गाशी एकरुप होत आचरावासिय एक वेगळा अनुभव आपल्या गाठीशी साठवून ठेवत आहेत. महिलांनी फुगडीचे फेर धरले आहेत तर किशोरवयीन मुली दांडिया, गरब्याच्या तालावर नाच करत संपूर्ण रात्रभर जागरण करत आहेत.
नदीच्या पात्रामध्ये डुंबायला सर्वजण सामील झालेले दिसत आहेत. संपूर्ण आचरा गावामध्ये सन्नाटा पसरला असून आचरा तिठ्यावर केवळ येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची ये-जा चालू आहे. आचऱ्याच्या इनामदार श्री देव रामेश्वरावर आपला लोककल्याणकारी राजा असल्याची नितांत श्रद्धा असल्याने या रामेश्वराची रयत श्याम मानव प्रकरणामुळे थोडी बिथरली असली तरी या गावपळणीवर त्याचा कोणताच परिणाम दिसून येत नसल्याचे ठिकठिकाणी असणाऱ्या आचरावासियांच्या तंबूना, राहुट्यांना भेट दिली असता स्पष्ट होत आहे.