कणकवली आपले वाटावे असे प्रयत्न करा!
By admin | Published: May 10, 2016 09:32 PM2016-05-10T21:32:52+5:302016-05-11T00:09:53+5:30
विनायक राऊत : कणकवली पर्यटन महोत्सवाचा समारोप
कणकवली : कणकवली नगरपंचायतीत सत्तांतरण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता सत्ताधारी म्हणून काम करणारे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व त्यांच्या सहकारी नगरसेवकांना ‘करून दाखवले’ हे सांगण्याचा अधिकार आहे, असे सांगतानाच पर्यटकांना कणकवली शहर आपलेसे वाटेल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
कणकवली नगरपंचायतीच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाच्या शानदार समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, उदय सामंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, बाल अभिनेत्री मृण्मयी सुपल, हर्षद गावडे, राजश्री धुमाळे, सुशांत नाईक, रूपेश नार्वेकर, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, डॉ. विद्याधर तायशेटये, अनिल डेगवेकर, गीतांजली कामत, छोटू पारकर, बबली राणे, उदय जामसंडेकर उपस्थित होते.
विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी आमचे सर्वतपरी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भरीव निधी दिला आहे. भविष्यात कणकवली शहर आणखीन नावारूपाला येण्यासाठी त्याला चांगले स्वरूप देण्याचा प्रयत्न संदेश पारकर व वैभव नाईक यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने करावा. त्याला आमची नेहमीच साथ असेल. तसेच पक्ष प्रवेशाबाबत पारकर यांनी लवकर निर्णय घ्यावा.
आमदार उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्गाला संदेश पारकर यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मित्रत्वाचे नाते जपत त्यांनी आमच्या सोबत यावे. कणकवलीकर कोणाला कधी डोक्यावर घ्यायचे आणि कधी खाली उतरायचे हे चांगले जाणतात. या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने विधानसभेत कधी कणकवलीच्या संदर्भातील प्रश्नांसाठी गरज लागली तर आपण निश्चितच मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वैभव नाईक म्हणाले, केवळ शहर विकासासाठी आम्ही नगरपंचायतीत संदेश पारकर यांना पाठिंबा दिला आहे. कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. युती शासनाच्या माध्यमातून शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल. कणकवलीकरांनी महोत्सवाला दिलेला प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देणारा आहे. व्यासपीठावरील संख्याबळ पाहून पारकर यांनी त्या पक्षात प्रवेश
करावा.
प्रमोद जठार म्हणाले, युती शासनामुळे सिंधुदुर्गात व रत्नागिरीत खऱ्या अर्थाने अच्छे दिन येऊ लागले आहेत. कणकवली शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन संदेश व कन्हैया पारकर यांना पूर्ण क्षमतेने मदत करेल.
माधुरी गायकवाड म्हणाल्या, अवघ्या सहा महिन्यांत असा भव्य महोत्सव आयोजित करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. यावेळी पुढील वर्षाचा महोत्सव डिसेंबरमध्ये घेण्याचे त्यांनी जाहीर केले.
कन्हैया पारकर यांनी प्रास्ताविक केले. बाल अभिनेत्री मृण्मयी सुपलचा यावेळी सत्कार करण्यात आला. तिने चित्रपटातील संवाद प्रेक्षकांसमोर सादर केले.
डॉ. विद्याधर करंदीकर, श्रीधर बडे, परशुराम साधले यांना कनकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले, तर सर्पमित्र भुजंग राणे, सुमीत वारंग, संकेत सावंत, संगीतकार प्रीतेश कामत, मितेश चिंदरकर, दिग्दर्शक सुहास वरुणकर, संजय राणे, प्रा. हरिभाऊ भिसे, निवेदक नीलेश पवार, राजेश कदम, शाम सावंत
यांनाही यावेळी गौरविण्यात आले. विविध स्पर्धांचे पारितोषिक
वितरण यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)
कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक, उदय सामंत, प्रमोद जठार, संदेश पारकर, माधुरी गायकवाड, आदी उपस्थित होते.