'गद्दारां'च्या साथीने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव!, शिवसेना नेत्याची भाजपवर टीका

By सुधीर राणे | Published: September 15, 2022 04:13 PM2022-09-15T16:13:37+5:302022-09-15T16:17:46+5:30

मोदी व शहांना मुंबई पालिका सहजासहजी मिळणार नाही

Plot to reduce the importance of Maharashtra with the help of Eknath Shinde group, Shiv Sena deputy leader Gauri Shankar Khot criticizes BJP | 'गद्दारां'च्या साथीने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव!, शिवसेना नेत्याची भाजपवर टीका

'गद्दारां'च्या साथीने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव!, शिवसेना नेत्याची भाजपवर टीका

Next

कणकवली: वेदांत फॉक्सकॉन हाच नव्हे तर इतर प्रकल्पही राज्याबाहेर नेऊन मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा हा भाजपचा डाव आहे. त्याला शिवसेनेतील 'गद्दारां'ची साथ असल्याची टीका शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केली. कणकवली येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गौरीशंकर खोत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदल्या दिवशी सांगतात आपण मोदी व शहांचे हस्तक आहोत आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातो. त्यामुळे असे मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे दुर्देव असून ते या पुढील काळात कार्यरत राहणे राज्यासाठी घातक आहे. वेदांता- फॉक्सकॉनमधून दिड लाख कोटींची गुंतवणूक व १ लाख रोजगार मिळणार असल्याचे जाहिर करण्यात आले. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी हा ४ लाख कोटींचा प्रकल्प राज्यात येत असल्याचे सांगितले. त्यासाठी बैठकाही झाल्या. मग हा प्रकल्प रातोरात येथून गेला कसा? केंद्र व गुजरात सरकारने बोलणी करून हा प्रकल्प रातोरात नेला. हाच नव्हे तर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे. या सरकारने ४० गद्दारांच्या सहाय्याने हे प्रकल्प राज्याबाहेर नेले.

मोदी व शहांना मुंबई पालिका सहजासहजी मिळणार नाही

मुंबई येथील जेएनपीटी बंदराचे महत्वही कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जिंकण्याची स्वप्ने ही मंडळी बघत आहेत. भाजपा गद्दारांना सोबत घेऊन ही स्वप्ने पाहत आहे. मात्र, १०५ जणांचे हुतात्म्य देऊन ही मुंबई शिवसेनेने व विविध पक्ष तसेच संघटनांनी मिळविली आहे. ती सहजासहजी मोदी व शहा यांना मिळणार नाही.

शिंदे गटात गेलेले ते ओवाळून टाकलेले

शिवसेनेतून शिंदे गटात जे गेले आहेत ते ओवाळून टाकलेले होते. त्यांच्या घरातलेही त्यांच्यासोबत नाहीत. त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यास यापुर्वीच सांगितलेले होते. त्यांचा ना सरकारला फायदा, ना पक्षाला, ना जनतेला, अशी टीका करतानाच शिवसेनेला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुकत्यांसाठी आंदोलन करण्याची गरज नाही. कारण अंतर्गत विरोधातून हे सरकार लवकरच पडेल. असा विश्वासही गौरीशंकर खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

राणेंनी बॉडीगार्ड न घेता फिरून दाखवावे!

मुंबईत शिंदे गट व शिवसेना यांच्यात झालेल्या वादात नारायण राणेंना पडण्याची गरजच काय ? शिवसैनिकाना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भाषा ते करत आहेत.त्यांना सिंधुदुर्गात व मुंबईतही शिवसैनिकांनी पराभूत केले आहे. त्यांच्या मुलालाही पराभूत केले हे त्यांनी विसरू नये. २०१४ मध्ये माझ्याही गाडीवर दगडफेक झाली. तरीही आपण बॉडीगार्ड न घेता फिरतो. मग राणे व त्यांच्या पुत्रांनी बॉडीगार्ड न घेता फिरून दाखवावे. असेही गौरीशंकर खोत यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राठोड, उत्तम लोके, सिद्धेश राणे, बबन मुणगेकर, रुपेश आमडोसकर, तेजस राणे आदी उपस्थित होते.

Web Title: Plot to reduce the importance of Maharashtra with the help of Eknath Shinde group, Shiv Sena deputy leader Gauri Shankar Khot criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.