कवी संमेलनात साहित्यप्रेमी भारावले
By admin | Published: October 26, 2015 11:21 PM2015-10-26T23:21:28+5:302015-10-27T00:15:18+5:30
कुडाळ येथील ‘गारवा’ कवी संमेलन : नवोदित कवींना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद
कुडाळ : नवोदित कवींच्या ‘गारवा’ कवी संमेलनातील कवितांनी साहित्यप्रेमींना भारावून सोडले. सुमार तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या कवी संमेलनातील नवोदीत कवींच्या कवीतांना प्रेक्षकांसह साहीत्यीकांनीही भरभरून दाद दिली.
कोमसापच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील नवोदित कवी लेखक यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन घेण्यात आले होते.
नवोदित कवींसाठी या साहित्य संमेलनात ‘गारवा’ या कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कवीसंमेलनात मोठ्या प्रमाणात नवोदित कवींनी भाग घेतला. यामध्ये जिल्ह्यातील पे्रमलता सावंत भोसले, मधुरा आठलेकर, गोविंद पायनाईक, मृण्मयी बांदेक र, स्रेहा राणे, अनुराधा दीक्षित, सुनंदा कांबळे, प्रतिभा चव्हाण, कल्पना बांदेकर, माधुरी जोशी, गौरी सावंत बांदेकर, लॅक्सी फर्नांडिस, राज सेरगे, सुप्रिया मिराशी, अजिंक्य यादव, सतीश साळगावकर, सोनाली नाईक, बाजीराव काळे, अवधुत नाईक, बाजीराव काळे, अवधुत नाईक, महेश बावलेकर, अंजली मुतालिक, अनिल कांबळे, किशोर वालावलकर व इतर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
या संपूर्ण साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन नीलेश जोशी यांनी केले. तर काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन साहीत्यीक प्रफुल्ल वालावलकर व हावळ यांनी केले. मुंबई येथे संपूर्ण कोकण विभागाच्या होणाऱ्या कोकण-मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसगे यांनी साहित्यिक व साहित्यप्रेमींना केले.(प्रतिनिधी)
उत्साहात समारोप : रसिकांची मने जिंकली
नवकवींनी सादर केलेल्या कवितांमध्ये विविधता होती. नवरसामध्ये असलेल्या सामाजिक, राजकीय, काल्पनिक, शृंगारिक, वैचारिक अशा विविध विषयांवर केलेल्या कवितांच्या सादरीकरणामुळे साहित्यप्रेमी, श्रोते तृप्त झाले. सायंकाळी उशिरा कवी विष्णू सूर्या वाघ, शशिकांत तिरोडकर, रूजारिओ पिंटो तसेच इतर कवींनीही आपल्या कविता ‘साज’ या कवी संमेलनात सादर करून रसिकांची मने जिंकली.
साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी विष्णू सूर्या वाघ व महेश जावकर यांच्या हस्ते हे संमेलन पार पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा सत्कार करण्यात आला.