पोयनारचे विस्थापित अडचणीत
By admin | Published: June 11, 2015 11:20 PM2015-06-11T23:20:02+5:302015-06-12T00:35:50+5:30
धरणाचे काम बंद : २२९ घरे विस्थापित, दोन बैठका निष्फळ
खेड : तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हे काम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ३५ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून हे काम करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप पुनर्वसनाचे काम सुरू झाले नसल्याने विस्थापित संकटात सापडले आहेत.
प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्याने प्रकल्पग्रस्त आणि उपजिल्हाधिकारी यांच्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे २२९ घरांचे विस्थापन अडचणीत आले आहे. दरम्यान, पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले असून, विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर या कामाला मुहूर्त मिळणार की नाही, याबाबत या धरणावर काम करणारे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या धरणग्रस्तांच्या मागण्यांवर विचार करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. मार्च २०१५मध्ये उपजिल्हाधिकारी राऊत आणि ग्रामस्थांमध्ये बैठक पार पडली होती. यावेळी ग्रामस्थांच्या सोयीनुसारच भूखंड वाटप करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरल्याने ही बैठक निष्फळ ठरली. यानंतर ७ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी हाच आग्रह कायम ठेवल्याने उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठक अर्धवट सोडावी लागली. दोन्ही बैठकांमध्ये भूखंड वाटपाबाबत ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. पोयनार धरणाचे अभियंता खेडेकर यांनी ही माहिती दिली. मात्र, असे असले तरीही पुन्हा याबाबत २ दिवसातच बैठक घेणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अडचणीत आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या मते प्रकल्पग्रस्तांच्या असहकार्यामुळेच पुनर्वसन संघर्षमय अवस्थेत पोहोचले आहे. परस्परविरोधी आरोप - प्रत्यारोपांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जागा संपादित करण्यात आल्याने त्यांच्या सोयीनुसार भूखंडाचे वाटप होणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांनी ही बाब ताणून धरल्याने चर्चा निष्फळ ठरविली जात आहे. मात्र, अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांना समजावून योग्य तो मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. धरणातील ७० टक्के काम पूर्ण झाले. या धरणाचे काम सुरू होण्यापूर्वी निधी उपलब्ध झाला होता, अशी माहिती खेडेकर यांनी दिली. उर्वरित काम निधीअभावी अनेकवेळा बंद करण्यात आले होते. आता हे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम मंदावले होेते. पोयनार धरणामुळे पोयनार गावातील ९० घरे, फुरूस गावातील १०६ घरे आणि धामणी गावातील ३३ घरे विस्थापित होणार आहेत. २२९ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. या सर्वांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी येथून कूळवहिवाट विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत आणि इतर अधिकाऱ्यांनी दोन वेळा पोयनार गावाला भेट दिली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार कारवाई सुरू केली असता ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. आम्हाला हवे त्या प्रमाणात भूखंडाची मागणी ते करीत होते. यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. तसे होणार नाही, असे सांगत सरकारी नियमानुसारच या भुखंडाचे वाटप होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
तांत्रिक त्रुटीमुळे काम बंद
खेड तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागांतर्गत अनेक वर्षे सुरू राहिले पोयनार धरणाचे काम.
पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे हे धरण अनेक कारणांनी गाजते आहे, कधी ठेकेदार, तर कधी शासन निर्णय, कधी निधीचा फटका.
धरण विस्थापितांचे प्रश्न अद्याप कायम राहिल्याने शेतकऱ्यांना वरदान ठरणारे हे धरण कायम चर्चेतच.