सागरी सुरक्षेबाबत पोलीस सतर्क : गुप्ता
By admin | Published: December 5, 2014 10:39 PM2014-12-05T22:39:28+5:302014-12-05T23:33:16+5:30
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी टापूत ज्या काही मच्छिमारी नौका , ५०० पेक्षा अधिक नौका या विनापरवाना आहेत
रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरात विनापरवाना मच्छिमारी नौका कार्यरत असतील, तर त्याबाबत मत्स्य व्यवसाय विभाग आवश्यक भूमिका घेईल. आपण समन्वयाच्या वेळी ही बाब त्या खात्याच्या निदर्शनास आणू. तसेच सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी पोलिसांची संख्याही वाढविली जाईल. सागरी गस्तीनौकाही कार्यरत आहेत, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी आज (शुक्रवार) येथे दिली.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी टापूत ज्या काही मच्छिमारी नौका आहेत, त्यातील ५०० पेक्षा अधिक नौका या विनापरवाना आहेत. निवती-कोचरेतील आंदोलनाच्या वेळी तेथील दिडशे नौका विनापरवाना असल्याचे समोर आले. दोन्ही जिल्ह्यात ही स्थिती असल्याने हा विषय गंभीर आहे, सागरी सुरक्षिततेसाठी हे घातक आहे, असे यावेळी पत्रकारांनी गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यावेळी ते बोलत होते.
सर्व पोलीस ठाण्यांच्या तपासणी दौऱ्यानिमित्त गुप्ता हे सध्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी पोलीस अधीक्षक संजय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी अशोक बनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)