‘त्या’ फरार महिलांना पोलिसांनी पकडले

By admin | Published: June 24, 2016 12:07 AM2016-06-24T00:07:49+5:302016-06-24T00:40:53+5:30

मोठे रॅकेट असण्याची शक्यता : पिंगुळीतील युवकाशी लग्न करून त्याला फसविले, दोन्ही महिला ताब्यात

Police arrested the absconding 'women' | ‘त्या’ फरार महिलांना पोलिसांनी पकडले

‘त्या’ फरार महिलांना पोलिसांनी पकडले

Next

कुडाळ : लग्न करण्याचे नाटक करून ४० हजारांचे दागिने व ३० हजारांची रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या बेळगाव नंदगड येथील तोतया नवरी व एजंट महिला या दोघांनाही कुडाळ पोलिसांनी बेळगाव नंदगड येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी या दोन्ही महिलांनी जिल्ह्यातील पाच ते सहा जणांना अशाच प्रकारे फसविले असल्याची शक्यता असून हे मोठे रॅकेट असण्याची असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.
पिंगुळी येथील मंगेश सांळुखे याचा विवाह १६ जून रोजी बेळगाव नंदगड येथील सुनिता जांबोडकर हिच्याशी झाला. या विवाहासाठी नंदगड येथीलच शाहीदा ताळीकुट्टी (वड्डोळ्ळी) ही मध्यस्थी होती. तिने हा विवाह ठरविण्यासाठी रोख ३० हजार रुपयांची रक्कम मंगेश याच्याकडून घेतली होती.
मंगेश याचा सुनिताशी विवाह बिबवणे विठ्ठल मंदिर येथे १६ जून रोजी सकाळी १० :४५ वाजण्याच्या सुमारास झाला होता. त्यानंतर १९ जून रोजी दुपारी वटपौर्णिमा सण साजरा केल्यानंतर सुनिता हिने मी शेजारच्या घरी जावून येते असे मंगेशला सांगितले व ती घराबाहेर पडली.
त्या दिवशी ती सायंकाळ झाली तरी परत आली नाही म्हणून तिची शोधाशोध सुरू झाली मात्र ती कुठेच सापडली नाही. याबाबत सुनिता ही बेपत्ता असल्याची तक्रार तिचा नवरा मंगेश याने दिली. सुनिता हिच्या अंगावर सुमारे ४० हजारांचे दागिने असल्याची माहिती मंगेश याने दिली. तक्रारीनुसार कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पडेलकर व त्यांचे सहकारी व पिंगुळीतील संकेत धुरी, विष्णू धुरी, प्रदीप माने व परशुराम कर्पे यांनी सुनिता हिच्या शोधासाठी बेळगाव येथील खानापूर पोलिस ठाणे बुधवारी गाठले. तेथे त्यांना तिचा पत्ता दाखविला असता ख
ानापूर पोलिसांनी नंदगड येथे जाण्यास सांगितले. सुनिताच्या तपासासाठी गेलेल्या या पथकाने थेट नंदगड पोलिस ठाणे गाठीत या संदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानुसार तेथील स्थानिक पोलिस तसेच आसिफ सय्यद व आणखी एका युवकाने या कुडाळच्या पथकासोबत जात त्या लग्न ठरविण्यासाठी मध्यस्थी करून ३० हजार रुपये उकळणाऱ्या शाहीदा हिला ती राहत असलेल्या भाड्याच्या घरातून दुपारी १२.३० वाजता ताब्यात घेतले. तसेच तिच्या कपाटात ठेवलेली रोख ३० हजार रूपयांची रक्कमही हस्तगत केली.
त्यानंतर लग्नाचा बनाव करून दागिने घेऊन पळून आलेल्या सुनिताला ती नंदगड येथे राहत असलेल्या घरी जात दुपारी २.३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी तिथे सुनिताचा दीर व त्याची बायको होती.
यावेळी सुतिता हिने पळवून नेलेले दागिने हस्तगत केले. मात्र सोन्याचा मुहूर्तमणी मिळाला नाही. या दोन्हीही महिलांना गुरूवारी रात्री कुडाळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी या दोघांविषयी अधिक चौकशी केली असता सुनिता ही विधवा असून तिला १५ वर्षांची मुलगी आहे. तर शाहीदा ही पैसे कमविण्यासाठी लग्न जुळविणारी एजंट आहे. १९ जून रोजी सायंकाळी सुनिता ही पिंगुळी येथून एका रिक्षामधून शाहीदा हिच्याबरोबर सावंतवाडीला गेली यावेळी त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होता तो कोण आहे व रिक्षा कोणती होती
याचा तपासही कुडाळ पोलिस घेणार आहेत. (प्रतिनिधी)


पोलिसांचे कौतुक : अन्य पाच-सहा जणांना फसविल्याची माहिती
या दोन्ही महिलांनी जिल्ह्यातील पाच ते सहाजणांना यापूर्वी अशाप्रकारे लग्न करून त्यांच्याकडील दागिने व रक्कम घेऊन पसार होत फसविले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशाप्रकारे यापूर्वी कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून त्या महिलांना अटक केली व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला यामुळे कुडाळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप पडेलकर व सहकारी पोलिस यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Police arrested the absconding 'women'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.