सिंधुदुर्ग : गणपती विसर्जनास नसेल पोलिसांचा हस्तक्षेप, रात्री १० वाजेपर्यंत वाद्ये वाजविण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:44 PM2018-09-07T12:44:51+5:302018-09-07T12:53:22+5:30

गणेशभक्तांना गणपती विसर्जनावेळी पोलिसांकडून हस्तक्षेप केला जाणार नाही. नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य केल्यास शांततेत गणेशोत्सव पार पाडला जाईल.

Police intervention without permission for Ganapati's immersion, allowed to play musical instruments at 10 pm | सिंधुदुर्ग : गणपती विसर्जनास नसेल पोलिसांचा हस्तक्षेप, रात्री १० वाजेपर्यंत वाद्ये वाजविण्यास परवानगी

मालवण येथे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देगणपती विसर्जनास नसेल पोलिसांचा हस्तक्षेपमिरवणुकीत रात्री १० वाजेपर्यंत वाद्ये वाजविण्यास परवानगी

मालवण : गणेशोत्सव काळात पोलिसांकडून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. गणेशभक्तांना गणपती विसर्जनावेळी पोलिसांकडून हस्तक्षेप केला जाणार नाही.

नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य केल्यास शांततेत गणेशोत्सव पार पाडला जाईल. या दृष्टीने व्यापारी, नागरिक तसेच गणेशभक्तांनी प्रयत्न करायला हवेत. विसर्जन मिरवणुकीत रात्री १० वाजल्यानंतर पारंपरिक वगळता अन्य वाद्ये वाजविली तर कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी मांडली.

मालवण पोलीस ठाण्यात तालुका शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, बांधकाम विभागाचे प्रकाश चव्हाण, सभापती मनीषा वराडकर, सुहास खडपकर तसेच उमेश नेरुरकर, विजय केनवडेकर, किरण वाळके, नाना साईल यांच्यासह व्यापारी, खासगी बसचे मालक आदी उपस्थित होते.

बैठकीत नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी पालिकेने केलेल्या वाहतुकीच्या नियोजनाची माहिती दिली. तर किरण वाळके यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत बाजारपेठेचा मार्ग बंद केला जात असल्याने व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे दीड, पाच, सात या दिवशी मार्ग बंद करण्यास शिथिलता देण्यात यावी तसेच गणेशोत्सवात भरड ते फोवकांडा पिंपळ हा मार्ग दुचाकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी केली.

यावेळी विजय केनवडेकर व कवटकर यांनी बांधकाम विभागाने बुजविलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी पालिकेच्या हद्दीतील रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

गणपती विसर्जनावेळी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात. मिरवणुकांतील वाद्यांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. तसेच डीजे, साऊंड सिस्टीम लावल्यास डेसिबलची कमाल मर्यादा ओलांडू नये.

गणपती विसर्जन शांततेत रात्री उशिरापर्यंत केल्यास पोलिसांचा अडसर नसेल. मात्र, समुद्रात विसर्जन करतेवेळी सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन चौधरी यांनी केले. यावेळी मालवणातील आपत्कालीन ग्रुप यावर्षीही मोफत गणपती विसर्जन करून देणार असल्याचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी महावितरण सज्ज

गणेशोत्सवात वीज वितरणने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सव काळात विनाखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास रेवतळे येथून शहराला वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी वीज वितरण सज्ज असल्याची माहिती वीज वितरणचे अधिकारी गुरुदास भुजबळ यांनी दिली.
 

Web Title: Police intervention without permission for Ganapati's immersion, allowed to play musical instruments at 10 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.