सुषमा अंधारेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:00 PM2022-11-22T13:00:51+5:302022-11-22T13:01:18+5:30
सीआरपीसी १४९ अंतर्गत बजावण्यात आल्या नोटीस
कणकवली : महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची आज कणकवलीत जाहीर सभा आहे. पोलिसांकडून या सभेच्या पार्श्वभूमीवर तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश व आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत पोलिसांकडून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीस बजावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी नोटीस बजावल्यामध्ये शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आचारसंहिता व मनाई आदेश कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा या सीआरपीसी १४९ अंतर्गत बजावण्यात आलेल्या नोटीस द्वारे देण्यात आला आहे.