पोलिसांनी रोखली बैलगाडी शर्यत
By admin | Published: April 20, 2017 12:06 AM2017-04-20T00:06:19+5:302017-04-20T00:06:19+5:30
पोलिसांनी रोखली बैलगाडी शर्यत
वैभववाडी : वैभववाडीनजीक कोकिसरे नारकरवाडी येथे आयोजित केलेली विनाफटका बैलगाडी शर्यत पोलिसांनी अर्ध्यावर बंद पाडली. त्यामुळे प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंखे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला. राजेंद्र नारकर व हिराचंद मुरकर यांना गाडीत कोंबून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या मागोमाग सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पोलिस निरीक्षकांचे दालन गाठले. त्यामुळे पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा नारकर व मुरकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करून तत्काळ सोडले.
कोकिसरे नारकरवाडी येथे श्री महालक्ष्मी मित्रमंडळातर्फे विनाफटका बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात झाली. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार हजार शौकिनांची गर्दी झाली होती. शर्यतीत जिल्ह्यातील १७ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.
जवळपास ९ गाड्यांची दौड पार पडल्यानंतर साडेपाचच्या सुमारास साहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एन. साळुंखे पथकासह शर्यतस्थळी दाखल झाले. त्यांनी आयोजक कोण? अशी विचारणा करीत राजेंद्र (बाळा) नारकर व हिराचंद (बाबय) मुरकर यांना पोलिसांच्या गाडीत कोंबले. त्यावेळी उपस्थित शौकिनांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यावेळी जयेंद्र रावराणे यांनी पोलिसांच्या गाडीतील दोघा आयोजकांना खाली उतरण्यास सांगून पोलिसांना जाब विचारला.
शर्यतस्थळी पोचल्यापासून पोलिसांनी चित्रिकरण सुरू केले होते. त्यामुळे जे जे चित्रिकरणात दिसतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा साळुंखे यांनी दिल्यामुळे सारे शांत झाले. त्यानंतर नारकर, मुरकर यांना पुन्हा गाडीत घालून पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे बैलगाडी शर्यत बंद पडल्याने उपस्थित हजारो शौकिनांचा हिरमोड झाला. पोलिस गाडीच्या मागोमाग शिवसेनेचे जयेंद्र रावराणे, भाजपचे राजेंद्र राणे, काँग्रेसचे कणकवली उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण, बंड्या मांजरेकर, रवी पाळेकर आदींनी सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे यांचे दालन गाठले.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या दालनात असल्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यात आली आहे.