पाच दुकानांसह पोलीस दूरक्षेत्र खाक
By admin | Published: December 5, 2015 11:25 PM2015-12-05T23:25:40+5:302015-12-05T23:31:36+5:30
मिठबाव बाजारपेठेत भीषण आग : कोट्यवधींच्या हानीचा प्राथमिक अंदाज
मिठबाव : देवगड तालुक्यातील मिठबाव बाजारपेठेत शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने आणि पोलीस दूरक्षेत्राची इमारत जळून खाक झाली. या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाली असून रात्री उशिरापर्यंत याबाबतचा तपशील निश्चित झाला नव्हता. मात्र, ही आग रात्री १0 वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
मिठबाव बाजारपेठेतील बाबू चोडणकर यांच्या मालकीच्या डीव्हाईन ट्रेडर्स व सानिया हार्डवेअर या दुकानांना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानात असलेल्या रंग, टर्फेन्टाईन व इतर प्लास्टिक वस्तूंमुळे आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. ही आग एवढी भीषण होती की, काही क्षणातच नजीकच्या मिठबाव पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीलाही आगीने वेढले. आग लागल्यावेळी ही दुकाने बंद होती. पोलीस दूरक्षेत्राबरोबरच कोकण शक्ती प्रिंटिंग प्रेसलाही आग लागून ती भस्मसात झाली. तसेच अनिरुद्ध फणसेकर यांच्या मालकीच्या अनुसया सायबर कॅफे व झेरॉक्स अशी आणखी दोन दुकाने जळून भस्मसात झाली.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील बहुतांशी दुकाने बंद होती. याचवेळी बाबू चोडणकर यांच्या मालकीच्या डीव्हाईन ट्रेडर्स व सानिया हार्डवेअर या दुकानांना अचानक आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, ग्रामस्थ ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असताना बाजारपेठेत दाटीवाटीने असलेल्या दुकानांमध्ये ती पुढे पुढे सरकत होती आणि ती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत अथक प्रयत्न करीत होते. (वार्ताहर)
सर्व साहित्य जळाले
- या सर्व दुकानांमध्ये असलेले फर्निचरसह सर्व साहित्य जळून गेल्याने हे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या दुकानांमध्ये असलेले संगणक, झेरॉक्स मशीन तसेच इतर मौल्यवान वस्तूंमुळे दुकानमालकांची मोठी हानी झाली आहे.