भिंत दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात, अन्य ठिकाणचे काम तूर्तास स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 04:43 PM2020-07-17T16:43:39+5:302020-07-17T16:46:22+5:30
कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. दरम्यान, उड्डाणपुलाचे उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्यात यावे. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महामार्गावर २४ तास पोलिसांनी लक्ष ठेवावे व वाहतुकीचे नियोजन करावे असे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी महामार्ग प्राधिकरण व दिलीप बिल्डकॉनला दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
कणकवली : कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. दरम्यान, उड्डाणपुलाचे उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्यात यावे. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महामार्गावर २४ तास पोलिसांनी लक्ष ठेवावे व वाहतुकीचे नियोजन करावे असे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी महामार्ग प्राधिकरण व दिलीप बिल्डकॉनला दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
कणकवली शहरातील उड्डाणपूल बॉक्सेलची भिंत कोसळल्यानंतर आम्ही कणकवलीकर परिवारातीच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी आदेशाची मागणी केली होती.
त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री व इतरांनी स्वतंत्रपणे या घटनेच्या अनुषंगाने कार्यकारी दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करीत कारवाईची मागणी केली होती. या अर्जदारांकडून दिलीप बिल्डकॉन व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्याविरूद्ध हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३३अन्वये अंतरिम आदेश काढले आहेत.
उड्डाणपुलाची संरक्षण भिंत कोसळणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना दिलीप बिल्डकॉन व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी तत्काळ कराव्यात असा आदेश प्रांताधिकारी यांनी दिला आहे. तसेच धोकादायक बनलेल्या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांव्यतिरिक्त उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्याचेही म्हटले आहे.
संबंधित परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी २४ तास देखरेख करण्यासाठी पर्यवेक्षण पथक नेमण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात ठेकेदार कंपनीकडून बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात आली. तेथे बांधकाम करून त्याखाली लोखंडी प्लेट लावून सर्व्हिस रस्त्यावरील वाहतुकीला धोका होणार नाही याची उपाययोजना करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.