किरकोळ कारणातून मारहाणीच्या घटना, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पोलीस सुरक्षा तैनात
By अनंत खं.जाधव | Published: November 16, 2023 03:58 PM2023-11-16T15:58:45+5:302023-11-16T15:59:52+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व नातेवाईक यांच्यात किरकोळ कारणातून वारंवार होणाऱ्या बाचाबाची मारहाणीच्या घटनामुळे आता पोलिसांकडून डॉक्टर ...
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व नातेवाईक यांच्यात किरकोळ कारणातून वारंवार होणाऱ्या बाचाबाची मारहाणीच्या घटनामुळे आता पोलिसांकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. दिवस-रात्र असे दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या दररोज असते. रुग्णालयात सर्व सुविधा चांगल्या प्रकारे मिळतात. त्यामुळे सावंतवाडीसह दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळसह जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. अपघातातील रुग्ण मारामारी अशा घटनांतील रुग्णांवरही उपचार केले जातात. रात्री, मध्यरात्रीही रुग्ण येत असतात. अशावेळी डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात काही कारणातून वादावादी होऊन प्रकरण हातघाईवर येऊन शिवीगाळ प्रकार होतात. त्यामुळे उपचार घेत असलेले रुग्ण व रुग्णालयातील कर्मचारी यांना त्याचा मानसिक त्रास होतो. विशेषतः अशा घटना रात्रीच्यावेळी घडतात.
मागील एक वर्षात डॉक्टर व नातेवाईक यांच्यात वाद झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्यावेळी सामोपचाराने मिटविण्यात आल्या. आठ दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. यावेळी सामोपचाराने वाद सोडविण्यास गेलेल्या रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला त्या दोघा युवकांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग व सुरक्षा रक्षक मंडळ यांनी याची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी रुग्णालयात असे प्रकार टाळण्यासाठी कायमस्वरुपी पोलीस तैनात ठेवण्याची मागणी करण्यात आली. जीवनरक्षक वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनीही रुग्णालयात पोलीस यंत्रणेने पोलीस कक्ष स्थापन करून कायमस्वरुपी पोलीस ठेवण्याची मागणी केली.
त्याची दखल सावंतवाडी पोलीस यंत्रणेने घेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पोलीस नियंत्रण कक्ष सुरू केला. या कक्षात दिवस-रात्र असे दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे आता रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग यांना ड्युटी बजावताना रुग्ण-नातेवाईक यांच्याकडून किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादावादी मारामारी घटनांना आळा बसणार आहे. रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टर यांनी शांतपणे समजावून सुसंवाद साधल्यास कोणताही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मसुरकर यांनी केले आहे.
रुग्णालयाकडून पोलिसांना पत्र
आठवड्यापूर्वी सुरक्षा रक्षक मारहाण प्रकरण घडले होते.त्याच वेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ.ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी पोलीस ठाण्याला पत्र देत रूग्णालयाला सुरक्षा रक्षक देण्याची मागणी केली होती.त्याप्रमाणे रूग्णालयास पोलीसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली आहे.